fbpx

आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक लवकर सुरू करणे आणि व्यावसायिक सल्लागाराचे मार्गदर्शन महत्त्वाचे

पुणे : गुंतवणुकीतून मिळणा-या उत्पन्नाबद्दलच्या अपेक्षांची स्पष्टता, गुंतवणुकीचा प्रारंभ लवकर करणे आणि व्यावसायिक सल्ला या आधारावर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठणे  सहज शक्य आहे, असे मत पुणे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शिअल अँबॅसेडर्स असोसिएशन (पिफा) तर्फे आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.  सदर कार्यक्रम नुकताच एस पी महाविद्यालयात संपन्न झाला.

भारताच्या लोकसंख्येतील तरुण व्यक्तींचे  प्रमाण मोठे असल्यामुळे विविध उत्पादनांची मागणी मोठी असेल आणि त्यासाठी जगभरातून औद्योगिक गुंतवणूक भारताकडे आकर्षित होईल. यातूनच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा वाढता असेल असेही प्रतिपादन तज्ज्ञांनी केले.
पिफा च्या गुंतवणूकदार जागृती उपक्रमांचा भाग म्हणून हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. पिफा अध्यक्ष बीना शेट्टी तसेच संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते. चंद्रप्रकाश पडियार  (सिनिअर फंड मॅनेजर, टाटा असेट मॅनेजमेंट ), अवनीश भटनागर (व्हाइस प्रेसिडेंट, फ्रँकलिन टेम्पलटन असेट मॅनेजमेंट), आणि  क्रिशन शर्मा ( व्हाइस प्रेसिडेंट, एच डी एफ सी म्युच्युअल फंड ) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
“मार्केट क्या लगता है ” या विषयावर पडियार यांनी जगातील विविध देशांच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची तुलनात्मक आकडेवारी सांगितली. “इतर अनेक देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली दिसत असली तरी निर्यातीत  घट आणि आयातीत वाढ या स्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेवर येत्या काही काळात ताण येईल आणि सरकारी तसेच खाजगीही नवीन गुंतवणूक ठप्प होऊ शकेल. यामुळे शेअर बाजारांवर परिणाम होऊन गुंतवणुकीतून मिळणा-या उत्पन्नावर मर्यादा येतील. मात्र अशा वेळी सावधपणे आणि टप्प्या टप्प्या ने गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात फायदाच होईल,” असे श्री पडियार  म्हणाले.
भटनागर यांनी गोष्टीरूप उदाहरणे देत गुंतवणूकदारांची मानसिकता विशद केली आणि ‘लवकर निघणे, सुरक्षित प्रवास करणे आणि योग्य मार्गदर्शकाची मदत घेणे” महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. शेअर बाजार खाली आला की सामान्य गुंतवणूकदार त्याकडे पाठ फिरवतात आणि बाजार वाढला की गुंतवणूक सुरू करून किंवा  आणखी वर नेतात ही विसंगती समजावून देत भटनागर म्हणाले की सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट हा पर्याय निवडून आणि त्यात नियमित भर घालून जोखीम कमी करत दीर्घकालीन नफ्या ची पायाभरणी करता येईल. भावनेच्या भरात निर्णय घेऊन निराशा पदरी घेण्यापेक्षा निष्णात सल्लागाराची मदत घेऊन गुंतवणुकीचे निर्णय घेणे हिताचे ठरेल, असे ते म्हणाले.
क्रिशन शर्मा यांनी “भारत २०४७” या विषयावर सादरीकरण केले. “जगभरात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत आहे आणि तरुणांचे कमी होत आहे. भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत असली तरी एकूण काम करू शकणा-या व्यक्तींमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. तरुणांचा खर्च करण्या कडे कला असतो त्यामुळे विविध उत्पादनांना मागणी वाढेल आणि त्यातून औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल. यातून अर्थव्यवस्थेची पातळी वाढून शेअरबाजारातून मिळणारे उत्पन्न वाढेल. मात्र ज्येष्ठांनी आपल्या वाढत्या वयातील गरजांचा विचार मनात ठेवून निवृत्तीनंतर च्या काळासाठी आर्थिक नियोजन वेळीच केले पाहिजे,” असे श्री शर्मा म्हणाले.
पिफा चे माजी अध्यक्ष हर्षवर्धन भुसारी यांनी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्र संचालन केले. विद्यमान अध्यक्ष बीना शेट्टी यांनी संस्थेची उद्दिष्टे आणि विविध उपक्रम याबद्दल माहिती दिली. संजय कोतकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: