fbpx

ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा गाण्यावर सुंदर एमी एलाबरोबर  हे चार ज्येष्ठ अभिनेते लावणार आग…

झुकेगा नही साला म्हणत साऊथच्या पुष्पराजने धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा गाण्यावर थिरकणारी समांथा आठवली का? आणि तिला थिरकायला लावणाऱ्या पुष्पाचा रोमँटीक अंदाज तर काय विचारूच नका. तो सगळा हॉटनेस लवकरच हिंदी मधील सुंदर अभिनेत्री एमी एला आणि मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांच्या डान्समध्ये उतरणार आहे.  झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डचा मंच हॉट बनणार आहे. आजच्या तरूणाईला लाजवत चार ज्येष्ठ अभिनेते झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या स्टेजवर एमी एला बरोबर नाचून आग लावणार आहेत. अभिनेत्यांची ही चौकडी आहे सुनील तावडे, विजय कदम, विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांची. हे चौघेजण स्टेजवर यही उमर है कर ले गलती से मिस्टेक म्हणत ठेका धरणार आहेत.

मराठीतील विनोदी नाटक आणि सिनेमांसाठी पुरस्कारांची बरसात करणाऱ्या झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळ्याचा काउंटडाउन सुरू झाला आहे. झी टॉकीज वाहिनीने मराठी मनोरंजन विश्वात यंदा १५ वर्षे पूर्ण केली आहेत. तर विनोदी कलाकार, नाटक, सिनेमे यांना गौरवण्यासाठी झी टॉकीज वाहिनीतर्फे गेल्या सात वर्षापासून झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळयाचं आयोजन केलं जातं. दरवर्षी झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डमध्ये  कुणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार , याची प्रेक्षकांना आणि चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. हास्याचे कारंजे फुलवणारे सिनेमे, नाटक, विनोदीपंच मारणारे कलाकार यांनाही एकदा तरी झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डवर माझे नाव कोरले जावे अशी इच्छा असते. हा सगळा माहोल ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता पहायला मिळणार आहे.

विनोदवीर दादा कोंडके यांच्या सिनेमातील हसून लोटपोट करणारे संवाद, ठसकेबाज गाणी यांची पर्वणी तर आहेच पण ज्येष्ठ अभिनेत्यांची सेकंड इनिंगही आयटम साँगवर थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या यंदाच्या खास सोहळ्यातील मऱ्हाठमोळ्या कार्यकमांना साउथचा तडका देण्यासाठी मराठीतील चार विनोदी अभिनेते हम भी कुछ कम नही म्हणत ठेका धरणार आहेत. एमी एला सोबत जयवंत वाडकर, सुनील तावडे, विजय पाटकर आणि विजय कदम यांचा घायाळ करणारा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आणि झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळ्याची मेजवानी लुटण्यासाठी प्रेक्षकांनाही आता उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: