fbpx

महिलांमध्ये समाजात सकारात्मक बदल घडविण्याची ताकद – डॉ.शेखर कुलकर्णी

पुणे : महिलांना समाजामध्ये बरोबरीची संधी मिळाली तर त्या केवळ स्वत:चेच आयुष्य बदलत नाहीत, तर त्यांच्यामध्ये समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची ताकद असते. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:ला प्रोत्साहन दिले पाहिजे. तर त्या समाजामध्ये अधिक खंबीरपणे उभ्या राहू शकतात, अशी भावना कॅन्सरतज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

एस.एस.असोसिएशन संचलित मानिनी अ‍ॅक्टिव्हिटी ग्रुपतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणा-या महिलांना मानिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्र म सिंहगड रस्ता, माणिकबाग येथील सिद्धार्थ हॉल येथे झाला. कार्यक्रमाला असोसिएशनच्या संस्थापिका स्मिता इंदापूरकर, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, मंजुषा नागपुरे, सुहास इंदापूरकर आदी उपस्थित होते.

ढोल-ताशा व्यापारी चंदा गाडे आणि ढोल वादन करणा-या स्तन कर्करोग रुग्ण माधुरी पिंगळे, ज्योती भोसले, शुभदा भाटे, अमिता गुजराथी, आश्लेषा राजहंस, सुनीता गानू, शुभदा पेडणेकर, नीता दर्जे यांना मानिनी पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर महाभोंडला व दांडियाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

डॉ.शेखर कुलकर्णी म्हणाले, ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण पुण्यामध्ये प्रत्येक २२ महिलांच्या मागे एका असे आहे, अशा परिस्थितीतही अनेक महिला या आजाराचा ताकदीने सामना करीत आहेत. या महिलांना कुटुंबाचा आधार मिळाला तर त्या अधिक आनंदी जीवन जगू शकता.

स्मिता इंदापूरकर म्हणाल्या, उच्च पदावर असलेल्या महिलांचा गौरव होतो, परंतु ब-याचशा महिला या सामाजिक आणि मानसिकरित्या भरडल्या जातात, अशा महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. महिलांची ताकद लक्षात घेऊन त्यांना समाजामध्ये अधिक चांगले बदल घडविण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. जयश्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मोहिती थोरात यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: