fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

रयत शिक्षण संस्थेने स्त्रियांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करावे – शरद पवार

पुणे : समाजाच्या जडणघडणीत स्त्रियांचा 50 टक्के वाटा आहे. कर्तुत्वाच्या बाबतीत स्त्रिया कुठेही कमी नाहीत मात्र स्त्रियांच्या कर्तुत्वाला प्रोत्साहन द्यायला आपण कमी पडतो, अशी खंत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेने स्त्रियांच्या कर्तुत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करावे असं आवाहनही पवार यांनी केले. रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शरद रयत चषक अंतर महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण समारंभात पवार बोलत होते.

या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील 32 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, पश्चिम विभागाचे चेअरमन ऍड. राम कांडगे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन ऍड.भगीरथ शिंदे,आमदार चेतन दादा तुपे,मीनाताई जगधने,आमदार अमितजी बेनके,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, डाॅ. दिगंबर दुर्गाडे सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,समन्वय समिती,जनरल बाॅडी सदस्य आदी उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग आहे जिथं लोक माझ्यावर बोलतात आणि मला ऐकावं लागतय. सहसा मी हे टाळतो. हा सगळा कार्यक्रम माझ्याभोवती केंद्रित आहे हे माझ्या लक्षात आलं. शालेय, महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. विज्ञानाभिमुख विषय विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी दिले पाहिजेत. जेणे करुन विद्यार्थ्यांमध्ये विचार प्रकिया घडून येते.

वळसे पाटील म्हणाले की, शरद पवार राजकारणी नेते असले, तरी राजकारणातून समाजकारण करायचं आणि त्यातून समाजाचा विकास करायचा ही भूमिका त्यांनी विद्यार्थीदशेपासून ठेवली आहे. अस कोणतेही क्षेत्र नाही जिथं पवारांचा वावर नाही. शरद पवार हे व्यक्ती नाही तर विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठात जीवनातले सगळे विषय शिकता येतात.

रयतला अत्याधुनिक करण्यात शरद पवारांचं मोठं योगदान आहे, अस मत संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी व्यक्त केलं. पवारांच्या दूरदृष्टीने रयत शिक्षण संस्थेत खूप पूर्वीपासून अत्याधुनिक शिक्षण देण्यास सुरवात झाली. इतकचं नव्हे तर नवीन राष्ट्रीय धोरणानुसार सर्व सोयी आम्ही उपलब्ध करुन देतोय. या कार्यक्रमात चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयाच्या स्मरणिकेचे आणि सुवर्ण स्मृती स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.शंकर पवार, नीता शेटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी आभार मानले.

पश्चिम विभागाचे चेअरमन मा. अॅड. राम कांडगे, विभागीय अधिकारी  के. डी. रत्नपारखी, सहा विभागीय अधिकारी एस. टी. पवार, प्राचार्य अरुण आंधळे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, एस.एम.जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड ,साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,चंदभागा बाबूराव तुपे साधना कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. बी. पी. गार्डी, प्रा. कैलास एरंडे, प्रा. उमेश पाटील, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. डॉ. अतुल चौरे,  विशाल कराळे ,प्रतापराव गायकवाड,महेंद्र जोशी,संजय निर्मळ, लहू रोडे,  पिलाने यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: