Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

गांधीविचार स्वीकारल्यासारखे भासवून संपविण्याचे प्रयोग

समीक्षक प्रा. डॉ. नितीन रिंढे यांचे सद्य:स्थितीवर परखड विश्लेषण,

कवी अजय कांडर यांच्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’चे प्रकाशन

पुणे : गांधी विचार संपविण्याचे कारस्थान आज जोमात सुरू आहे. विचार स्वीकारल्यासारखे भासवून संपविण्याचा हा प्रयोग असून, याकरिता वेगवेगळी प्रतीके वापरली जात आहेत. मात्र, खरोखरच विचार कधीच संपत नसतात आणि गांधीविचार तर कदापि संपविता येणार नाहीत, असा दृढ विश्वास नामवंत समीक्षक व मराठी भाषा संशोधन मंडळाचे नवनियुक्त संचालक प्रा. डॉ. नितीन रिंढे यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
कवी अजय कांडर लिखित ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या हर्मिस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दीर्घ काव्यसंग्रहाचे प्रकाशन येथील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात प्रा. रिंढे व रंगगर्मी अतुल पेठे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
रिंढे म्हणाले, आजचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण वेगळे आहे. त्यावरची ही कविता आहे. कवी अजय कांडर यांनी आपल्या कवितेतून गांधीविचाराची गरजच बोलून दाखविली असून, ही कविता वाचकाला निश्चितपणे नवी दृष्टी देऊ शकेल. वास्तविक गांधी विचारांचा विपर्यास हा त्यांच्या हयातीतच सुरू झाला होता. आज गांधी विचार संपविण्याचे कारस्थान अतिशय जोमाने सुरू असल्याचे दिसते. विचारांवर हल्ला करून ते थेटपणे संपविणे आणि विचार स्वीकारून तो संपविणे, असे दोन प्रकार आहेत. त्यातला दुसरा प्रकार आज वापरला जात आहे. गांधीविचार स्वीकारल्यासारखे भासविले जात आहे. गांधींच्या वेगवेगळय़ा प्रतीकांचा वापर त्याकरिता करण्यात येत आहे. आपल्या सिस्टिममध्ये गांधी बसविले जात आहेत. परंतु, हे करताना त्यांचा म्हणून जो मूलभूत विचार आहे, तो स्वीकारला जात आहे का, हा मोठा प्रश्न आहे. अर्थात विचार कधीच संपत नाहीत. गांधीविचारांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे हा विचार संपविण्याचा डाव कधीच यशस्वी होणार नाही.
अतुल पेठे म्हणाले, आजचा कालखंड हा विपरित आहे. अशा काळात कवी, वाचक, नाटककार, लेखक असतील, तर घाबरायचे काही कारण नाही. कलावंत निर्भिडपणे व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच तसेच ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या चारही कवितासंग्रहातील सामाजिकतेचा धागा उलगडून दाखवित गांधीविचारांचे आजच्या काळातील महत्त्वही पेठे यांनी अधारेखित केले.
अजय कांडर म्हणाले, आज गांधीविचारांची, त्यांच्या शांततेची, अहिंसेची सर्वाधिक गरज आहे. 2014 पासून देशातील स्थिती बदलते आहे. माणूसपण संपविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा काळात संवादाच्या जागा वाढविल्या आहेत. गांधीविचारातूनच हे शक्य होऊ शकते.
प्रास्ताविक सुनील धसकटे यांनी केले, तर संदेश भंडारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading