fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अस्पृशांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली, ही मोठी क्रांती : रामदास आठवले

पुणे  : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरात 1852 मध्ये अस्पृश्य, दलित विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. ही त्यावेळी फार मोठी क्रांती होती. हाच वसा पुढे घेऊन जात कालकथीत एम.डी. शेवाळे यांनी डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य पुढे सुरू ठेवले, ही स्तुत्य गोष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महात्मा जोतिराव फुले वं सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यांसाठी सुरु केलेल्या पहिल्या शाळेचे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयात’ रूपांतर आणि कालकथीत एम.डी. शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्मरणिका व दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार सुनील कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संस्थेचे जनरल सेक्रेटरी व आरपीआयचे राष्ट्रीय खजिनदार विशाल शेवाळे, अध्यक्ष डी. टी. रजपूत, शिल्पताई भोसले, काजल शेवाळे, वर्षा पाटील, सिद्धार्थ शेवाळे, अविनाश बागवे, परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, प्रदीप चव्हाण, अजय भोसले, राजाभाऊ सरोदे, प्राचार्य डॉ. नरेश पोटे, उपप्राचार्य डॉ. जे.के. म्हस्के, डॉ. बाळासाहेब सोनवणे, संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, की कालकथीत एम.डी. शेवाळे हे रिपब्लिकन ऐक्यवेळी ते माझ्यासोबत ठामपणे उभे राहिले होते. ते एक अभ्यासू नेते होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. राजकीय क्षेत्रातही ते अग्रेसर भूमिका मांडत. त्यांनी अनेक युवकांना मदत करीत राजकारण व समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. शिक्षणावर अतोनात प्रेम करणारे होते. त्यामुळेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य त्यांनी पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
आमदार सुनील कांबळे म्हणाले, की दलित मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत प्रतिकूल या शाळेची सुरुवात करण्यात आली. ही संस्था चळवळीचे महत्त्वाचे हे केंद्र बनले होते. एम.डी. शेवाळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यांचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वावर आहे. या ठिकाणी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज सुरु व्हावे, ही अपेक्षा आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, की या संस्थेचे काम लक्षात घेता एम.डी. शेवाळे कायम स्मरणात व आदर्श राहतील. संस्थेचे काम चांगले असल्याने पुणे महापालिकेने या संस्थेसोबतचा करार पुन्हा नूतनीकरण केला आहे. या संस्थेसाठी हवी ती मदत करण्यास आपण कटीबद्ध आहोत.
शिल्पा  भोसले यांनी आपले वडील एम.डी. शेवाळे यांच्या आठवणी जागवत त्यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
राजाभाऊ सरोदे यांनी सांगितले, की एम.डी. शेवाळे यांनी अनेक कार्यकर्ते घडविले आहेत. त्यांचे राहिलेले कार्य कार्यकर्ते पूर्ण करतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश जमदाडे यांनी, सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी, तर आभार शुभदा नगरकर यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: