Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यात अंधश्रद्धेचा कळस; पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, उच्चभ्रू घरातील घटना 

पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात समोर आली आहे. पुत्रप्राप्तीसाठी व भानामती नाहीशी व्हावी म्हणून मांत्रिकाच्या सांगण्यावरून पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याची लाजिरवाणी गोष्ट उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला वेळोवेळी मारहाण करून पैसे ही उकळण्यात आले आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेचा पती, सासरे, सासु आणि मांत्रिक यांच्यावर आयपीसी 498 अ, 323, 420, 406, 504, 34 यासह महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासऱ्यांकडून फिर्यादीचे वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आले. फिर्यादीला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेऊन त्यावर बनावट स्वाक्षरी करुन 75 लाखाचे कर्ज घेतले. तसेच फिर्यादी यांच्या पतीने व्यावसायात भरभराट आणि घरात शांतता नांदावी म्हणून फिर्यादीसोबत अघोरी पूजा देखील करायला लावली. फिर्यादी महिलेच्या पती, सासू, सासरे यांनी भानामती नाहीशी व्हावी, यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन रायगड येथे नेऊन फिर्यादी यांना सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली. महिलेने तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading