मेटे यांचे काम पुढे नेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली – शिवसंग्राम संघटना
पुणे : विनायक मेटे यांच्या जाण्यामुळे मराठा समाजाला कोणी वाली उरला नाही. मेटे यांचे काम पुढे नेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना शिवसंग्राम संघटनेच्या शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या.
काल पुण्यातील “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह” येथे स्व.आ.विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा अतिशय शोकाकुल वातावरणात पार पडली. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, माजी महापौर अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, बाबा धुमाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे,मराठा महासंघेचे जिल्हाध्यक्ष वैभव शिळीमकर, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, शिवसंग्रामचे सरचिटणीस विक्रांत आंबरे, युवक प्रदेशाध्यक्ष उदय आहेर तसेच डॉ. मानसी जाधव, डॉ. मनीषा मेटे, सागर पवार, सतीश मोहोळ, भोला वांजळे आदींनी श्रद्धांजली वाहिली. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मेटे यांच्या नावाने द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी व जखमींना मदत मिळण्यासाठी सुसज्ज केंद्र उभारावे अशी मागणी माळवदकर यांनी केली. तर मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना आमदारकी देण्याची मागणी अंकुश काकडे यांनी केली.
या शोकसभेचे प्रास्ताविक शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे यांनी तर सूत्रसंचालन प्रदेश सचिव शेखर पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे शिवसंग्रामचे भरत लगड, कालिंदि गोडांबे, कल्याणराव आडागळे, विनोद शिंदे, चैतन्य पवार, लहू ओहळ यांनी केले.
