देश गंभीर संकटात असताना कामगारांनी राजकीय भूमिका घेत सत्ता परिवर्तन करणे गरजेचे – उदित राज
पुणे : देशांमधील अनेक मोठ्या संघटना कमजोर झाल्या असताना राष्ट्रीय मजदूर संघासारखी संघटना कामगारांसाठीचा लढा ताकदीने देतेय, वाढतेय हे कौतुकास्पद आहे. हा लढा अजून वाढावा अश्या शुभेच्छा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या असंघटित कामगारांचे नेतृत्व करणार्या असंघटित कामगार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार उदित राज यांनी दिल्या.
मागील २२ वर्षे अविरतपणे कार्यरत असणार्या राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, ‘असंघटित कामगारांची एकूण संख्या देशभरात ४५ कोटींच्या आसपास आहे. नोटबंदी, जीएसटी य़ासारख्या केंद्र सरकारच्या देशविघातक निर्णयांमुळे हा वर्ग पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. यासोबतच महागाई मुळे या वर्गाचे जगणे अधिकच मुश्किल झाले आहे. हा वर्ग गंभीर संकटात असताना दुसरीकडे या देशातील भांडवलदारांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. कामगारांना काहीही सुविधा किंवा मदत न देणारे सरकारने या भांडवलदारांचे मात्र लाखो करोडो रूपयांचे कर्ज माफ केलेले आहे. शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनामुळे कामगार कायदे लागू करण्यात आलेले नाहीत कारण सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढू इच्छित नव्हते. पण हे नवीन कामगार कायदे आल्यानंतर कामगारांचे जे काही हक्क आहेत ते सर्व हक्क संपतील.
देशातील कामगार आणि इतर जनतेला त्यांच्या या मूळ समस्यांवरून भरकटविण्यासाठी हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण केल्या जात आहेत, देशामध्ये धर्मांध वातावरण तयार केल्या जात आहेत. आपल्या हक्कांसाठी लढत असताना कामगारांनी या धर्मांधतेच्या हल्ल्याला वेळीच ओळखून याविरोधात लढा दिला पाहिजे. देशामध्ये हे धर्मांध वातावरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक घरामध्ये दोन कार्यकर्ते आहेत – एक न्यूज चॅनेल आणि दुसरे वर्तमानपत्र. या दोन्हींपासून दूर राहत कामगारांनी आपले प्रश्न सोशल मिडिया मार्फत जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे.
राष्ट्रीय मजदूर संघाचा 22 व्या वर्धापन दिनानिमित्त संघटित व असंघटित कामगारांचा मेळावा, कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष डॉ उदित राज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आमदार संग्राम थोपटे, कामगार राज्य विमा महामंडळ पुणे प्रदेशाचे उपनिदेशक हेमंत पांडे, प्रदेश काँग्रेस समन्वयक प्रज्ञा वाघमारे, एडवोकेट अभय छाजेड, दीप्ती चौधरी, कमलताई व्यवहारे हे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सभेत घरेलू कामगार, बांधकाम मजूर, सुरक्षारक्षक, मनपा मधील कंत्राटी चालक, पाणीपुरवठा कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी, कंत्राटी सुरक्षा रक्षक, त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉस्पिटल, कंपन्या, कारखाने येथील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी काँग्रेस भवन ते बालगंधर्व रंगमंदिर, अशी पदयात्रा संघटनांचे बॅनर हातामध्ये घेऊन काढण्यात आली.
या कार्यक्रमात राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या. पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी संग्राम थोपटे यांच्याकडे करण्यात आली. त्याच बरोबर बदलेले कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करू नये त्यामध्ये कामगार विरोधी निर्णय रद्द करावे अशी मागणी यावेळी केली.
मेळाव्याचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन निता परदेशी यांनी केले व आभार प्रदर्शन एस के पळसे यांनी केले.
