प्रामाणिकपणे काम करणं ही खरी देशसेवा – स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न
पुणे : ‘ कोणतीही गोष्ट करण्यात देशाला समोर ठेवा. आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणं हे आपलं कर्तव्य असून हीच खरी देशसेवा आहे.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. निमित्त होते दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाचे.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव डॉ. एम. डी. भारती, भारत वेदपाठक, प्रसाद भडसावळे, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
अत्रे म्हणाल्या, ‘सारं विश्र्व भारताकडे आज आदरानं, आशेनं पहात आहे. भारताच्या स्वातंत्र्य समरात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाप्रती आपलीही जबाबदारी आहे यांचं भान ठेवून आपापल्या क्षेत्रात समर्पित भावनेतून काम करण्याची शपथ घेऊ.’ याप्रसंगी विद्यार्थ्यांनी समुहगीतं सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यभामा पानसरे यांनी केले.
