Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरावर ध्वजारोहण 

पुणे : हर घर तिरंगा या अभियानांतर्गत बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी व महिला स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान करण्यात आला.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंदिर स्थापनेचे  हे १२५ वे वर्ष आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सव प्रमुख अॅड. रजनी उकरंडे, सुनील रुकारी, युवराज गाडवे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई उपस्थित होते. यावेळी ९७ वर्षीय महिला स्वातंत्र्य सैनिक श्यामल गुप्ते, शहिद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या वीरमाता गीता गोडबोले, शहिद जवान विजय मोरे यांच्या वीरपत्नी दिपाली मोरे यांचा सन्मान करण्यात आला.

उल्हास पवार म्हणाले, लोकप्रतिनीधींसाठी जनता हेची जनार्दन आहेत. जनतेच्या सुख दुःखाची काळजी घेणे म्हणजेच त्यांचे पूजन आहे. म्हणून लोकप्रतिनिधी हे जनतेचे उपासक असायला हवेत, असे त्यांनी सांगितले.

गीता गोडबोले म्हणाल्या, देशासाठी मुलगा शहीद झाला याचा अभिमान तर आहेच. पण आता प्रत्येक घरात तिरंगा फडकणार याचा देखील अभिमान वाटतो. नागरिकांकडून घेतली जाणारी आमची दखल ही आमच्यासाठी मोलाचा पाठिंबा आहे, असे ही त्यांनी सांगितले.

वीरपत्नी दिपाली मोरे म्हणाल्या, आपल्या देशाचा ध्वज तीन रंगात आहे आणि मधे अशोकचक्र. हे अशोकचक्र म्हणजे माझे कुंकू मी देशासाठी दिले आहे. देशाचा तिरंगा आता आपण प्रत्येक जण घरात अभिमानाने फडकवू, असेही त्यांनी सांगितले. कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading