पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना क्लीनचिट
पुणे:पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना दिलेला क्लीनचिट अहवाल समोर आला आहे. पोलिसांच्या अहवालात पूजा चव्हाण हिची आत्महत्या किंवा अपघाती निधन झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. पूजाचे प्रकरण भाजपने उचलून धरल्याने मंत्री संजय राठोड यांना तत्कालीन वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज त्याच भाजपसोबत शिंदे गटाने केलेल्या युतीमध्ये राठोड मंत्री आहेत.
शिंदे सरकारमध्ये संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर टीका केली. राठोड यांच्या मंत्रीपदाचा वाद क्षमत असताना, आता संजय राठोड यांना पोलिसांकडून मिळालेली क्लीनचिट समोर आली आहे. पूजा चव्हाणप्रकरणी संजय राठोड यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. शिवाय, पूजा चव्हाण हीचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघाती मृत्यूने झाल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. या क्लीन चिटमुळे पुन्हा एकदा राठोड यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या टिक टॉक स्टार पूजा चव्हाणने ७ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप होता. तत्कालीन विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी विधानसभेत संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
निःपक्षपाती चौकशीसाठी मी स्वतः राजीनामा दिला. आता पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. जेव्हा आरोप झाले तेव्हा मानसिक तणावात होतो. गेली ३० वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात वावरतोय. मात्र, माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला. या आरोपामुळे बाजूला होतो. आता पोलिसांनी राजपत्र प्रकाशित केले आहे. त्यामुळे निष्कलंक असून शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये शपथविधी घेतल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत गप्प होतो मात्र पुन्हा आरोप केल्यास कायदेशीर नोटीस बजावणार.असा इशाराही राठोड यांनी दिला आहे.