Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

ग्रामीण-शहरी मुलांमध्ये संवाद वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत – अनिकेत आमटे

पुणे : शहरी भागातील पालक समानतेच्या गप्पा मारतात. मात्र प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या मुलांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाठवतात. मुलांना महागडे मोबाईल घेऊन देतात. पण, हेमलकसासारख्या दुर्गम भागातील मुलांना पायाभूत शैक्षणिक सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे शहरी भागातील मुलांना सभोवतालच्या वातावरणाविषयी विचार करायला भाग पाडण्यासाठी त्यांचा ग्रामीण मुलांबरोबर संवाद वाढविण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिकेत प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

लायन्स अँड लिओ क्लब ऑफ पूना शिवाजीनगरच्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त शास्त्री रस्त्यावरील सॅफरॉन बॅन्क्वेट येथे आयोजित कार्यक्रमात अनिकेत आमटे यांना लायन्स सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. क्लबचे सेक्रेटरी निलेश कुलकर्णी, खजिनदार संजय मुनोत, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. ज्योति तोष्णीवाल, जगदीश बांगड, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर परमानंद शर्मा, शमा शर्मा, विजय जाजू आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी क्लबचे अध्यक्ष म्हणून जीवन हेंद्रे, लियो क्लबच्या अध्यक्षा किमया हेंद्रे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला. बांगड यांनी मागील दोन वर्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. त्यांच्या टीमने विविध सामाजिक कार्याची उभारणी करतानाच त्यासाठी सुमारे बारा लाख रूपयांचा खर्च केल्याचे बांगड यांनी यावेळी सांगितले. परमानंद शर्मा यांनी नव्या सदस्यांना पदाची शपथ दिली.

अनिकेत आमटे म्हणाले, हेमलकसा, आनंदवन या भागात प्रकाश आमटे यांच्या परिश्रमातून अनेक सामाजिक कामे करण्यात आली. सध्या ते आजाराशी लढत आहेत. ते लवकरच बरे होतील. गेल्या वीस वर्षांपासून मीसुद्धा माझ्या परीने समाजकार्यात योगदान देत आहे. मात्र, वीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शाळांमध्ये शिकून मोठी झालेली मुले सध्या विविध क्षेत्रात कामगिरी करत आहेत. हे यश बघण्यासाठी संयमाची आवश्यकता असते.

ते पुढे म्हणाले, लोकांच्या आग्रहास्तव अनेक सामाजिक कामे सुरू झाली. शहरातील नागरिकांना आपले दु:ख मोठे वाटते. पण त्यांनी ग्रामीण भागातील माणसांचे दु:ख पाहिल्यास त्यांना आपले दु:ख खूपच कमी असल्याचे जाणवेल. त्यासाठी सर्वांनी हेमलकसा, आनंदवनला भेट द्यावी. मुलांना ग्रामीण व दुर्गम भागातील स्थिती दाखवावी. तसे झाल्यास ग्रामीण-शहरी मुलांमध्ये संवाद वाढेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading