‘ही’च गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया – रूपाली पाटील ठोंबरे
पुणे : “बंडखोर नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत नवीन गटाची स्थापना केली. तेव्हापासून शिवसैनिकांच्या मनात राग कायम आहे. आतापर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगला पण आता संयमाचा बांध सुटला आहे. पुण्यात जे झालं ती गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया होती’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आज दिली.
मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर पुणे शहरातील कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. यावर ठोंबरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘एखाद्या बायकोसोबत अडीच वर्ष संसार करायचा आणि मग कुरघोड्या काढायच्या ही जुनी सवय आहे, अडीच वर्ष हेच उदय सामंत मंत्री राहिले आणि आता ईडी सीबीआय मागे लागली म्हणून बंडखोरी केली म्हणून त्यांना आता काय बोलावं ते सुचत नाही’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली.
दरम्यान, मंगळवारी शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांची मंगळवारी पुण्यातील कात्रज चौकात सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा संपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात असताना त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची चारचाकी गाडी दिसली. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. उदय सामंत हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
