स्वतः पलीकडे जगण्याची प्रेरणा सैनिक देतात – सुमेधा चिथडे
पुणे : ” सैनिकांसाठी काम करताना गरजा आणि हाव यातील फरक कळले. जात, धर्म,वंश, पंथ, भाषा यापलीकडे जाऊन काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सैन्यदल. ते ठराविक वेळेत कार्य करत नाही, की एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून संपावर जात नाहीत. स्वतः जगताना राष्ट्र प्रथम हा विचार घेऊन जगत असतात. स्वतः पलीकडे जगण्याची प्रेरणा सैनिक देतात,” असे मत सैनिकांसाठी काम करणाऱ्या ‘ सिर्फ ‘ संस्थेच्या सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केले.
हिंदू महिला सभेतर्फे क्रांती दिनानिमित्त चिथडे यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते ‘साहस’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र आणि ११,००० रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे सरूप आहे. सियाचीन या जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमीवर आणि काश्मीरमधील कुपवाडा सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट’ची उभारणी आणि सैनिकांसाठी त्यांनी केलेल्या विविध कामांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले उपस्थित होत्या.
चिथडे म्हणाल्या” आजही आपल्या राष्ट्रापुढे खूप मोठी आव्हाने आहेत. भविष्यात आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी आताच आपण पुढे येऊन राष्ट्र सेवेसाठी कार्य केले पाहिजे.”
कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले,” स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आजही आपल्याला अनेक सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिस दलासाठी, रस्त्यावरील भीक मागणाऱ्या मुलांसाठी, स्वच्छतेसाठी अशा अनेक समस्यांच्या निराकरणासाठी सुमेधा ताईंसारख्या रणरागिणींची गरज आहे. अजूनही आपल्यापैकी अनेक जणांना हे वाटते की आपण हे करू शकत नाही. मात्र आधी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुढील संघर्षाचा सामना करण्यासाठी आपल्या मुलांमध्ये शौर्यवृती निर्माण केली पाहिजे. “
कार्यक्रमात सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलीनच्या संचालिका रमा चोभे आणि संस्थेच्या ३६ मुलांनी व्हायोलिन वादनातून देशभक्तीपर गीते सादर केली. जयोस्तुते श्रीमहनमंगले, नन्हा मुन्हा राही हू, भारत हमको जान से भी प्यारा है, वंदे मातरम् अशा विविध रचना मुलांनी सादर केले. केदार परांजपे (सिंथेसायाझर) आणि ऋषीकेश कोरे (ढोलक) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना साने यांनी केले.
