राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मानसिक स्थैर्य बिघडले आहे – खासदार संजय सिंह
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी टीका केली. ते म्हणाले की, संविधानात्मक पदावरील व्यक्तीने असे बोलणे योग्य नाही. मुंबई व महाराष्ट्राच्या भूमीने विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना रोजगार व आर्थिक उन्नतीच्या संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता हवी. महाराष्ट्र ही सामाजिक धार्मिक सलोखा असलेली व्यापार, रोजगार देणारी, उद्यमशील आणि विचारवंतांची भूमी आहे. मात्र येथील राज्यपाल शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. त्यांचे मानसिक स्थैर्य बिघडलेले आहे, त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य ते करत असतात, अशी टीका संजय सिंह यांनी केली.
आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्र स्तरीय युवा अधिवेशन 2022 नुकतेच पुण्यात पार पडले. या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे आम आदमी पार्टीचे राज्यसभेवरील खासदार संजय सिंग यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोदींच्या नेतृवाखालील भाजप सरकारने जल, जमीन, विमानतळ, रेल्वे, सरकारी कारखाने, विमा, तेल आणि वीज उद्योग विकले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्पोरेट उद्योगपतींची 11 लाख कोटी रुपयांची कार्पोरेटची कर्जे माफ केली आहेत. देशातील बेरोजगार युवक युवतींना अच्छे दिन आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजयसिंग यांनी पुणे येथील आप युवा अधिवेशनात केला आहे. पुणे येथे आप युवा अधिवेशनाचे उदघाटन संजयसिंग यांचे हस्ते झाले.
यावेळी मंचावर आप महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचूरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, सचिव धनंजय शिंदे, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, निवडणूक प्रभारी महादेव नाईक, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे, युवा आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संदीप सोनवणे, जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवा कार्यकर्ते नाशिकचे अभिजीत गोसावी, नागपूरच्या कृतल आकरे, कोल्हापूरचे उत्तम शिंदे यांनी युवकांच्या वतीने मनोगते व्यक्त केली.
