Sunday, April 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक : देशाच्या अर्थ व्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे असते. ही बाब विचारात घेऊन या लहान उद्योग व्यवसायांना पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देवून या व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. जिल्ह्यात आज या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असून यातूनच सबका साथ आणि सबका विकास होतांना दिसत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘पीएम स्वनिधी महोत्सव’, स्वावलंबी पथविक्रेता यांच्या उत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी  फारांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पथविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. जर आपल्याला आत्मनिर्भर भारत ही ओळख घेऊन पुढे जायचे असेल तर अशा वेळी शेतकरी, छोटे उद्योग व्यवसाय, बचत गट तसेच तळागाळातील लोकांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पथविक्रेत्या लाभार्थ्यांसोबतच त्याच्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी लाभार्थ्यांला इतर आठ योजनांचा देखील लाभ उपलब्ध करून देण्‍याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात देशातील 75 शहरांची निवड करण्यात आली त्या शहरांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश असून योजनेतील आपल्या जिल्ह्याने केलेली कामगिरी देशात व राज्यात उल्लेखनीय असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

केंद्र सरकारने स्वनिधी योजनेंतर्गत देशपातळीवर साधारण 36 लाख लाभार्थ्यांना 3 हजार 592 कोटी रुपयांची रक्कम कर्जपोटी वितरीत करण्यात आली आहे. तसेच 12 लाख पथविक्रेत्यांनी पहिल्या कर्जाच्या रकमेची परतफेड केली आहे. राज्यात दोन लाख लाभार्थी असून एक लाख पाच हजार कुटुंबांनी या योजनेतून मदत घेतली आहे. कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी टीम वर्क आवश्यक असते. प्रगती करण्यासाठी प्रयत्नांची ताकद महत्वाची असते. या विचारातूनच जिल्ह्यात या टीमवर्कच्या मदतीनेच सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी पीएम स्वनिधी योजनेची यशस्वी अंमलबजावणी होतांना दिसत आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या योजनेसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले.

यांचा झाला सन्मान

रामेश्वर खंड, सुनंदा भामरे, नामदेव शेंडगे, गिता शिंदे, नंदा पाटील, गोपाळ वरणकर, गोकुळ गरूड या पथविक्रेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तर बँक ऑॅफ महाराष्ट्राचे राजेश पाटील, एसबीआय बँकेचे गौतम गरूड, युनियन बँकेचे जिल्हा समन्वयक महेश धुणे, सुनिल बारा, बँक ऑफ बडोदाचे जितेंद्र नवलखा, इंडियन ओवरसिस बँकेच्या सरिता देशमुख, बिझनेस बँकेचे वसंत गुरूवाणी या उत्कृष्ट काम करणाऱ्या बँकांचा यांचा सत्कार करण्यात आला. तर शिवगंगा व गजानन महाराज महिला बचत गटास प्रत्येकी रुपये एक लाख, जय मल्हार महिला बचत गटाला रूपये दोन लाख तर सरस्वती महिला बचत गटाला तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading