fbpx

‘शतपैलू वसंत’ मधून उलगडले कविवर्य वसंत बापट यांच्या काव्यातील शब्द सामर्थ्य 

पुणे :  छडी लागे छमछम विद्या येई घम घम… भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा…सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे…चुकलो का मी पुन्हा सांग ना… अशा कविवर्य वसंत बापट यांच्या एकाहून एक सरस रचनेच्या सादरीकरणातून त्यांच्या काव्यातील शब्दसामर्थ्य आणि शब्दसौंदर्य उलगडले. कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणातून वसंत बापट यांच्या कवितांचा मनसोक्त आनंद घेण्याची संधी पुणेकरांनी घेतली.

कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळी व इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शतपैलू वसंत’ या सुरेल काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले होते. कविवर्य वसंत बापट हे स.प.महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते, त्यामुळे महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद््घाटनप्रसंगी शि.प्र.मंडळीचे कार्यकारिणी सदस्य पराग ठाकूर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट आदी उपस्थित होते.
इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, गौरी शेटे, भूषण पाठक, वर्षा न्यायाधीश यांनी यावेळी काव्यवाचन केले. तर, शाहीर हेमंतराजे मावळे यांनी पोवाडा सादरीकरण केले. रेणुका स्वरुप प्रशालेच्या १०० विद्यार्थीनींनी एकत्रितपणे कविता सादर करीत वसंत बापट यांना आदरांजली अर्पण केली.

‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ यामधून ताकदीने मांडलेल्या वीर रसासोबतच गोरे गोरे गाल तुझे…रंगाने तू गव्हाळ… यामधून शृंगार रस देखील तितक्याच नजाकतीने सादरीकरणातून पुढे आला. विरहाची व्यथा सांगते भावनचे कल्लोळ मांडणा-या ‘ फुंकर ‘ या कवितेतून एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळुवार भावनाविष्कार सादर झाला.

कळले आता घराघरांतून नागमोडीचा जिना कशाला… पुरुषाच्या मनातील गोंधळ सांगणारी ‘विस्मृती’ ही कविता…शृंगारिक लावणीतून जगाचा निरोप घेत असतानाच्या भावना ‘लावणी अखेरच्या विनवणीची’ या सादरीकरणाने उपस्थितांना भावूक केले. शाहीर हेमंतराजे मावळे व सहका-यांनी ‘स्वातंत्र्याचा जय जयकार’ हा पोवाड्याचे दिमाखदार सादरीकरण केले.

ज्यांच्या कवितांनी गेली, जवळपास ८० वर्षं रसिक मनाला भुरळ पाडली त्या कविवर्य वसंत बापट  यांनी लिहिलेल्या अजरामर प्रार्थना, देशभक्तीपर गीते, निसर्ग कविता, व्यक्तिचित्रणपर कविता, बालकविता, प्रेमकविता, शृंगारिक लावण्या यावेळी सादर करण्यात आल्या. अभ्यासपूर्ण निवेदनातून एकामागून एक उलगडत जाणा-या कवितांची एक प्रकारे ही सुरेख काव्यसुमनांजलीच कलाकारांनी अर्पण केली.

Leave a Reply

%d bloggers like this: