fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले – राहुल देशपांडे

पुणे  : सकारात्मक उर्जेने केलेले कोणतेही काम चांगलेच होते असे मी मानतो. ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती सकारात्मक ऊर्जा होती. आपण केवळ चित्रपटासाठी काम करत नाही तर वसंतरावांसाठी काम करत आहोत, याच विचाराने सर्व जण काम करत होते. त्या सकारात्मकतेमुळे ही एक चांगली कलाकृती घडली आहे. या चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले,’’ असे मत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केले.

देशपांडे यांना नुकताच ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील उत्कृष्ट पार्श्वागायनासाठी ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सोमवारी  संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे यांच्या हस्ते देशपांडे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या कार्यक्रमात देशपांडे यांनी चित्रपट, संगीत नाटक, गायन, रिअलिटी शो, अशा विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. संघाचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन केले.

देशपांडे म्हणाले, “ माझे आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करायची हे जेव्हा आम्ही ठरवले, त्यानंतरचा प्रवास खूप खडतर होता. सर्वात आधी त्याला निर्माता मिळायला अडचण येत होती. ते मिळाल्यानंतर चित्रपट ‘फ्लोअर’वर येण्यासाठी तीन चार वर्षे लागली. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी करोनामुळे लॉकडाऊन घोषित झाल्याने दोन वर्षे चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला लोकांकडून जो प्रतिसाद मिळाला तो हेलावून टाकणारा होता. अनेकांनी सोशल मिडीयावर या चित्रपटाबाबत भरभरून कौतुक केले. प्रत्यक्ष फोन करून, मेसेज करून कौतुक केले. त्यामुळे चांगले काम केल्याचे समाधान मिळाले.’’

चित्रपटासाठी रसिकांनी दिलेला प्रतिसाद महत्वाचा आहेच, पण आपण केलेल्या कामाची शासन दरबारी घेतलेली दखलही तितकीच महत्वाची आहे. या राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने ती घेतली गेली याचा आनंद वाटत आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.

कार्यक्रमात आपल्या आजीविषयी बोलताना राहुल देशपांडे म्हणाले, “ माझ्या आजीला नेहमी असे वाटायचे की, मी माझे आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांच्यापेक्षाही मोठे व्हावे. ती मला नेहमी असे म्हणत असत. माझे आजोबा सवाई गंधर्व महोत्सवात ते हयात असेपर्यंत दरवर्षी गायचे. त्यामुळे या महोत्सवाशी माझे एक वेगळे नाते आहे. जेव्हा पहिल्यांदा मी सवाई गंधर्व महोत्सवात गायलो, त्यावेळी सर्वांना सांगितले की आज मी माझ्या आजीसाठी गात आहे. तिने जेव्हा ते गाणे ऐकले तेव्हा तिला अतिशय आनंद झाला. तिने सर्वाना बोलावून विचारले, राहुल कसा गायला आहे? ते म्हणाले, “चांगला गायला”. तेव्हा ती म्हणाली “ माझा नातू वसंतरावांपेक्षाही चांगला गायला आहे.” आज जेव्हा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा तिची खूप आठवण येत आहे. आज ती असती, तर आपल्या नातवाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे बघून तिला नक्कीच तिला खूप आनंद झाला असता.’’

रिअलिटी शो’बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशपांडे म्हणाले, “ रिअलिटी शोज मध्ये त्यांना ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी ‘मोमेंट्स’ बनवावे लागतात. स्पर्धक हा अतिशय गरीब किंवा बंडखोर आहे, असे दाखवले जाऊ लागले. त्यातल्या काही काही गोष्टी मला पातल्या नाहीत. परंतु काही प्रमाणात क्रिएटिव्ह लिबर्टी’मधून रिअलिटी शो बाहेर पडतील, तेव्हा त्याच्यामधून चांगली गाणी गायली जातील आणि ऐकलीही जातील.’’

संगीत नाटक याविषयावर राहुल देशपांडे म्हणाले, “ संगीत नाटक हा प्रकार आपल्याकडे खूप वर्षे चालू हेच अनेकांना माहित नव्हते. आजच्या पिढीला हा प्रकार कळावा, या हेतूने मी काही जुनी संगीत नाटके केली परंतु यापुढे पुन्हा संगीत नाटक करायचे झाल्यास जुनी नाटकं करणार नाही, तर नवीन संकल्पनेवर छान नवीन संहिता मिळाली तर नवीन संगीत नाटक करेन.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading