fbpx

 ‘नामाचा गजर ‘ हा संत रचना व अभंग यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम संपन्न

पुणे : ‘रामकृष्ण हरी’, ‘रूप पाहता लोचनी ‘ , ‘ बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘ काया पंढरीची’, अशा एकाहून एक अभंगांच्या गायनाने रसिक दंग झाले. विविध लोकप्रिय तसेच स्वरचित रचनांचे सादरीकरण आणि सूर-तालाने रंगलेली एक भक्तीमय संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली.

कलाश्री संगीत मंडळ व जे. व्ही. इंगळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नामाचा गजर’ हा संत रचना व अभंग यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम शनिवारी, दिनांक २३ जुलै रोजी मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे यंदा ६ वे वर्ष आहे. कार्यक्रमासाठी सवाई मसालेचे राहुल जाधव, विश्वेश्वर सहकारी बँक आणि  गणेश देशमुख असोसिएटस यांचे  सहकार्य लाभले. कार्यक्रमात कलाश्री संगीत मंडळातर्फे देण्यात येणारा ह. भ. प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार पंडित हेमंत पेंडसे यांना उद्योजक जे. व्ही. इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी इंगळे यांच्या पत्नी मेधा इंगळे, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य व किराणा घराण्याचे गायक पंडित श्रीनिवास जोशी, मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पंडित डॉ. विकास कशाळकर, दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम ग्रुप’चे प्रकल्प प्रमुख  बाळू पाटील उपस्थित होते. संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी याप्रसंगी आपले गायन सादर केले.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलननाने झाली. त्यानंतर धारवाड घराण्याचे प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रहिमत खान यांचे नातू, तर उस्ताद बाले खान यांचे पुत्र व शिष्य असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक उस्ताद रईस बाले खाँ आणि हाफिज बाले खाँ यांनी अभंग रचना सादर करत प्रथमच मराठीतून गायन सादर केले. ‘रामकृष्ण हरी’ या अभंगाने त्यांनी गायनाला सुरवात केली. त्यानंतर गायीन तुझे नाम, ध्यायीन तुझे रूप’ ही संत तुकाराम महाराजांची अभंग रचना, जन्मासी येऊनी पहावे पंढरी, ‘बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले’, ‘हरी नाचला अमुचा हरी नाचला हो’ या अभंग रचना सादर केल्या. कन्नड अभंग सादरीकरणाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यानंतर शाश्वती चैतन्य यांचे गायन झाले. त्यांनी रूप पाहता लोचनी आणि विष्णूमय जग हे अभंग सादर केले. किराणा-ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका सावनी शेंडे -साठ्ये यांनी आपल्या गायनाने कार्यक्रमात तिसरे पुष्प गुंफले.  त्यांनी सादर केलेल्या ‘गाऊ वाणू तुझ विठो, तुझा करू अनुवाद’ या स्वरचित रचनेने रसिकांची मने जिंकली.  ‘बोलावा विठ्ठल’ या अभंगाने त्यांनी गायनाचा समारोप केला.

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात  पं. श्रीनिवास जोशी आणि त्यांचे पुत्र व शिष्य विराज जोशी यांनी एकत्रितपणे गायन सादर केले. ‘काया ही पंढरी’ या गीताने त्यांनी सादरीकरणास सुरवात केली.  त्यानंतर ‘सगुणाची सेज निर्गुणाची बाज’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘इंद्रायणी काठी’ हे अभंग सादर केले.  त्यांच्या ‘तीर्थ विठठल, क्षेत्र विठ्ठल’ या अभंग गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रमुख कलाकारांना पांडुरंग पवार (तबला), रोहित मुजुमदार (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), गंभीर महाजन (पखवाज) आणि रवींद्र पंडित (टाळ) यांनी साथसंगत केली. मंडळाचे विश्वस्त सच्चीदानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमात  पुरस्काराबाबत बोलताना पंडित हेमंत पेंडसे म्हणाले, ” आज हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या सर्व गुरूंची आठवण होत आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न आपण करतो मात्र त्या प्रयत्नांमध्ये आपल्या गुरूंचे आशीर्वाददेखील तितकेच महत्वाचे असतात. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अजूनही गुरू- शिष्य परंपरेची महती कायम आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: