fbpx

टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या मौसमाचे पुनरागमन

पुणे : टेनिस प्रीमियर लीग(टीपीएल)स्पर्धेमुळे टेनिस शौकिनांच्या सर्वांगीण करमणुकीसाठी पारंपरिक टेनिसचे एक नवे रूप लोकप्रिय झाले आहे. आयपीएलच्या धर्तीवर टेनिसचे एक अपारंपरिक व आधुनिक रूप म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या टेनिस प्रीमियर लीगचा चौथा मौसम यंदाच्या वर्षी पुण्यात रंगणार आहे.

येत्या 7 ते 11 डिसेंबर या कालावधीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडीत खेळल्या जाणाऱ्या टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या मौसमात 8 फ्रॅंचायझीचे संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. बेंगळुरू स्पार्टन्स, चेन्नई स्टॅलियन्स, दिल्ली बिन्नीज ब्रिगेड, फाईन कॅप हैद्राबाद स्ट्रायकर्स, गुजरात पँथर्स, मुंबई लिऑन आर्मी आणि पुणे जॅगवॉर्स असे 7  फ्रॅंचायझी जाहीर झाल्या असून आठव्या फ्रॅंचायझीची घोषणा अद्याप बाकी आहे.

टेनिस प्रीमियर लीगच्या 2022च्या चौथ्या मौसमासाठी खेळाडूंचा लिलाव येत्या ऑगस्ट महिन्यात होणार असून त्यामुळे प्रमुख भारतीय खेळाडूंना जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याबरोबरच मुंबई, दिल्ली, हैद्राबाद आणि गुजरात येथे येत्या ऑक्टोबर महिन्यात गुणवत्ता शोध मोहीम राबविण्याचा आणि त्यातून प्रत्येक शहरांतून एक वाईल्ड कार्ड प्रवेशिका म्हणून एका गुणवान खेळाडूला थेट प्रवेश देण्याचा आयोजकांचा विचार आहे.

ही स्पर्धा पुढील फॉरमॅटमध्ये खेळविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व आठ  फ्रॅंचायझीचे संघ उपांत्य फेरीस पात्र ठरण्यासाठी एकूण चार लढती खेळणार आहे. यातील प्रत्येक लढतीत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी व मिश्रा दुहेरी अशा चार सामन्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघास 20 गुण मिळणार आहेत, म्हणजेच प्रत्येक संघाला सर्वाधिक एकूण 320 गुण मिळवण्याची संधी आहे. साखळी स्पर्धेअखेर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यामध्ये एका खेळाडूला किमान दोन सामने खेळता येणार आहेत.

 2022मधील विम्बल्डन पुरुष दुहेरी विजेता मॅथ्यू एबडेन याची या चौथ्या मौसमासाठी बहुमोल खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी मॅथ्यू एबडेन म्हणाला की, 2022 हे वर्ष माझ्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. टेनिस प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊन टेनिसची लोकप्रियता जगभर वाढवण्याच्या मोहिमेत सहभागी होता आल्याबद्दल मला आनंद झाला आहे. 
एबडेन पुढे म्हणाला की, भारताशी आणि येथील भारतीय टेनिसपटूंशी माझे नेहमीच खास नाते राहिले आहे. भारतीयांच्या टेनिसविषयी असलेल्या प्रेमाबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटते. त्यामुळेच टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने भारतात येण्यास मी उत्सुक होतो. विशेषकरून पुणे शहराशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच, भारतीय खेळाडूंमध्ये भरपूर गुणवत्ता असून यंदाच्या भेटीत अनेक युवा भारतीय खेळाडूंना मी प्रेरणा देऊ शकेल, अशी मला अशा आहे.  
 
मुंबई लिऑन आर्मी संघाचे मालक आणि 2020मधील मॅथ्यू एबडेनचा माजी दुहेरी साथीदार लिएण्डर पेस याने मॅथ्यू एबडेनच्या नियुक्तीबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने जगभरातील गुणवान खेळाडू भारतात येणार असून त्यामुळे उच्च दर्जाचे टेनिस पाहायला मिळणार आहे. गुणवत्ता शोध मोहिमेच्या निमित्ताने टीपीएलचे संयोजक सामाजिक कार्य करीत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. 
 
या निमित्ताने बोलताना अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या मौसमाबद्दल मी अतिशय उत्सुक असून यंदाची स्पर्धा टेनिस शौकिनांसाठी अतिशय मनोरंजक ठरले असा माझा विश्वास आहे. टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेने भारतातील टेनिसच्या पायाभूत स्तरापासून  प्रगतीस्तरापर्यंत पोहोचण्यात मोलाचे योगदान दिले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारतातील युवा खेळाडूंसाठी काही रोल मॉडेल निर्माण करण्याचा आणि भारताला भविष्यात टेनिसमध्ये जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारल्याबद्दल मी पुणे शहर आणि संयोजकांचे आभार मानतो.

Leave a Reply

%d bloggers like this: