fbpx

७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत पुण्यातील मे. शिव स्टील ट्रेडर्सच्या दौलत शिवलाल चौधरी या व्यापाऱ्याला जवळपास ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी व विक्री बिलांचा व्यवसाय केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती वस्तू व सेवाकर विभागाने दिली आहे.

या व्यापाऱ्याने बनावट खरेदी व विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडिट पास ऑन करून शासनाचा १३.०८ कोटींच्या कर महसुलाची हानी केल्याने अटक करण्यात आली.

वस्तू व सेवाकर विभागाकडील उपलब्ध विविध विश्लेषण प्रणालीच्या आधारे सखोल विश्लेषण करून करचोरांचा शोध घेण्यात आला. यात मे. शिव स्टील ट्रेडर्स या व्यापाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेंतर्गत दौलत शिवलाल चौधरी यांना दि. १३ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली आहे.

मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी या व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त, (अन्वेषण) हृषीकेश अहिवळे, चंदर कावळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवली. या संपूर्ण कारवाई दरम्यान अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, (पुणे क्षेत्र) यांचे मार्गदर्शन मिळाले.

सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगीरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. या मोहिमेत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २७ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: