fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

Pune Metro – शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या जागेत ‘या’ कारणांमुळे बदल

पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो (मेट्रो लाइन-३) मार्गिकेच्या भाऊसाहेब खुडे चौकातील (सिमला ऑफिस) स्टेशनमुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) प्राचीन इमारतीचा दर्शनीय भाग (फ्रंट व्ह्यू) झाकोळला जात असल्याने येथील स्टेशनच्या जागेत बदल केला जाणार आहे. महापालिकेच्या वारसा विभागाने (हेरिटेज सेल) प्रस्तावित बदलांना मान्यता दिली असून, त्यानुसार येथील स्टेशनची चौकातील जागा ५० फुटांनी (१६ मीटर) बदलण्यात आली आहे.

पुण्यातील मेट्रो लाइन-३ चे काम सध्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू आहे. मेट्रोच्या मूळ आराखड्यानुसार गणेशखिंड रस्त्यावर भाऊसाहेब खुडे चौकात या मार्गिकेच्या ‘शिवाजीनगर’ स्टेशनची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, या चौकातच दुमजली स्टेशनची निर्मिती झाल्यास सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या हवामानशास्त्र विभागाच्या प्राचीन इमारतीचा दर्शनी भाग नागरिकांना सुस्पष्ट दिसू शकणार नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता.

महापालिकेच्या वारसा स्थळांमध्ये या इमारतीचा समावेश असल्याने येथील स्टेशनची जागा हलविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. महापालिकेच्या हेरिटेज कमिटीमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम करणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ कंपनीला विविध पर्यायांची चाचपणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याची व्यवहार्यता तपासून चौकातून हे स्टेशन अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाच्या दिशेने १६ मीटर हलविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हेरिटेज कमिटीने त्याला मान्यता दिली आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचे शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) येथील स्टेशनसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. हे स्टेशन कोर्टाच्या इमारतीच्या समोरच येणार होते. स्टेशनच्या अलीकडे ग्रेड सेपरेटर आणि पुढील बाजूला रेल्वे ट्रॅक असल्याने या स्टेशनच्या आराखड्यात कोणताही बदल करणे शक्य नसल्याचा दावा ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ कंपनीने केला. त्यानंतर विविध पर्यायांचा अभ्यास करून कंपनीने सुचविलेले काही बदल हेरिटेज कमिटीने मान्य केले. त्यानुसार येथील स्टेशनची बाह्यरचना कोर्टाच्या इमारतीप्रमाणे करण्यात येणार असून, कोर्टाच्या दैनंदिन कामकाजात अडथळे येऊ नयेत, यासाठी ‘नॉइज बॅरियर’ बसविले जाणार आहेत. कोर्टाच्या बाजूला येणाऱ्या खिडक्या अथवा इतर मोकळ्या जागा पूर्ण बंद करण्यावर सहमती झाली असून, येथील स्टेशन इमारतीच्या ‘शॅडो’मध्ये कोर्टातील वकील व इतरांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. मेट्रोच्या खांबांसाठी आवश्यक पायलिंगवर सध्या भर दिला जात असून, नुकतेच एक हजार पायलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याशिवाय, हिंजवडी आणि गणेशखिंड रस्ता अशा ठिकाणी मेट्रोच्या २२ खांबांचे काम पूर्ण झाले आहे. आगामी काळात मेट्रोच्या कामाचा वेग आणखी वाढविण्यात येणार असल्याची माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.

शिवाजीनगर येथील हवामान विभागाच्या इमारतीसमोरील स्टेशनच्या आराखड्याबाबत विविध शक्यता आणि पर्यायांची तपासणी केल्यानंतर स्टेशनच्या जागेत काही फेरबदल करण्यात आले असून, त्याला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाच्या ऐतिहासिक इमारतीचे महत्त्व अबाधित राहील.

  • चंद्रकांत दळवी, अध्यक्ष, हेरिटेज कमिटी, पुणे महापालिका

Leave a Reply

%d bloggers like this: