Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही – नितीन गडकरी

मुंबई, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत संकल्प ते सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते‍ विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल किंवा या महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल असोत यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण होणार आहे. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही  गडकरी म्हणाले.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वरळी सी लिंकला नरीमन पॉईट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीपटीपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरु करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांना बंगळूरुशी जोडणारे आणि पुणे ते औरंगाबाद हे महामार्ग करण्याचे नियोजन सुरु असून राज्य शासनाने या महामार्गावरील जमिन अधिग्रहणाचे काम तत्काळ सुरु करावे असेही गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading