fbpx

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झालं आहे. सकाळी आबे हे एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज संपली. भारतीय वेळेनुसार दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आबे यांना मृत घोषित करण्यात आलं. उद्या भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. 

आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते ६७ वर्षांचे होते. पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये एका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावरील या सभेमध्ये आबे यांचं भाषण सुरु असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते. आबे हे शहरातील एका रस्त्यावर भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला आणि घटनास्थळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

गोळी लागल्यानंतर आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचाही दावा स्थानिक प्रकारमाध्यमांनी केला. आबे यांना बेशुद्धावस्थेतच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळजवळ तीन तास ते मृत्यूशी झुंज देत होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २०२१ मध्ये भारत सरकराने शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 

Leave a Reply

%d bloggers like this: