fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे काळंबेरं – अजित पवार

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस अजित पवारांनी चांगलाच गाजवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केल्यानंतर यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांना प्रतिप्रश्न केला. एकनाथ शिंदे जर एवढे सर्वगुणसंपन्न होते तर त्यांनी शिंदे यांना फक्त रस्ते विकास महामंडळ हे एकच खातं का दिलं? असा प्रश्न विचारून पवारांनी शिंदेंच्या कार्यकौशल्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. तसेच १०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही. पण ५० आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते. यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असं अजित पवार म्हणाले.

देवेंद्रजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते झाले

विधानसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीसांचं भाषण आम्ही नेहमीच ऐकतो. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा उत्साह दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच, अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री झाले. अडीच वर्षांत असा प्रवास करणारे ते एकमेव नेता असल्याचंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत, हे सतत का सांगावं लागतं? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत असं सतत सांगावं लागत असेल तर आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचंही अजित पवार म्हणाले.

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना बहुमताचा ठराव घाईघाईत आणणे गरजेचे नव्हते. राज्यपालांनी आतापर्यंत अनेक गोष्टी लांबणीवर टाकल्या. अनेकदा अनेक समस्या घेऊन मी आणि एकनाथ शिंदे राज्यपालांकडे गेलो. राज्यपाल आम्हाला थांबवून बऱ्याच गोष्टींवर चर्चा करायचे. पण तरीही अनेक कामं रेंगाळली. मात्र, आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आमच्या काळात १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी त्यांनी वेळ दिला नाही. विधानसभा अध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतरही आम्ही राज्यपालांकडे वेळ मागितली. विविध अधिवेशनात याबाबत मागणी केली. कॅबिनेटमध्ये ठरावही करायचो. पण अध्यक्षपदाची तारीख तेव्हा लागली नाही. मात्र, नवं सरकार सत्तेत आल्यानंतर तत्काळ अध्यक्षपदाची निवडणूक लागली.

अजित पवार आपल्या अधिवेशनाच्या भाषणात नेहमीच हटके शैली वापरतात. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ते आपले मत मांडत असतात. यावेळीही त्यांनी अनेक नेत्यावंर मिश्किल टिप्पणी केली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनाही टोला लगावला. सूरतला जाण्याआधी अब्दुल सत्तार माझ्याशी आणि जयंत पाटलांशी दोन तास बोलले. आमच्यात चांगल्या गप्पा झाल्या. पण त्याहीवेळी त्यांनी बंडखोरीबाबत काहीही सांगितलं नाही. आमच्याशी दोन तास गप्पा झाल्यानंतर ते थेट सूरतलाच गेले, असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading