उदय सामंतही पोहचले गुवाहाटीला शिंदे गटात
मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदय सामंत हे गुवाहाटीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. चार्टड विमानाच्या लिस्टमध्ये उदय सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे.

कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते उदय सामंत यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल असतानाच रविवारी त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. त्यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या काही समर्थकांमध्ये मात्र उदय सामंत गुवाहटीला पोहोचल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेनेत (खळबळ उडाली आहे.
राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता.
शनिवारी पत्रकारांशी बोलतानाही सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे उदय सामंत नक्की कुठे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अशात शनिवारी मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले होते.
मात्र, रविवारी दुपारी सोशल मीडियावर सामंत गुवाहटीला रवाना झाल्याचे समजले आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले. एका व्हॉटअप ग्रुपवर ते सुरत मार्गे रवाना झाल्याचीही चर्चा रंगली होती. त्यांचा दूरध्वनी लागत नसल्यामुळे याला पुष्टी मिळत होती. परंतु, अधिकृत शिंदे गटात सामील झाल्याचे वृत्त आलेले नाही.