एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
पुणे : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूम परांडा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घराजवळ, कात्रज येथे शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी त्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
या आंदोलनाच्या वेळी शिवसेनेच्या यूवती अध्यक्षा, शर्मिला येवले , सचिन जोगदंड शिवसेनेचे कात्रज भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाच्या वेळी एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात आला.
शर्मिला येवले म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांनीसद्यस्थितीत काही अडचणी किंवा तक्रारी असतील तर त्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणे गरजेचे होते.पण गुजरात व आसाममध्ये जाऊन शिवसेना पक्षासमोर आवाहन निर्माण करणे योग्य नाही. अजूनही वेळ गेली नाही. बंडखोरांनी मुख्यमंत्र्यांना भेटावे. शिवसेनेशी कोणीही दगाबाजी करू नये. आत्तापर्यंत अनेक बिकट प्रसंगांना शिवसेनेने समर्थपणे तोंड दिले आहे. या संकटातून सावरून शिवसेना दमदारपणे वाटचाल करेल. कारण सामान्य शिवसैनिक ठाकरे कुटुंबाबरोबरच आहे, असे शर्मिला येवले म्हणाल्या.