fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

कलेचे व्याकरण समजण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक : सतीश आळेकर

पुणे : प्रशिक्षण घेतले म्हणजे अभिनेता होता येईल असे नाही. कलेचे व्याकरण समजण्यासाठी, आत्मभान मिळण्यासाठी नाट्य प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक सतीश आळेकर यांनी केले.

नाट्य चळवळीत 43 वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहून नाट्यप्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या त्रिसूत्रीचा अवलंब केलेल्या पुण्यातील नाट्यसंस्कार कला अकादमीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या नाट्य अभ्यासक्रमाची माहिती प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना व्हावी यासाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आळेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे, नाट्य अभ्यासक्रमाच्या समन्वयक अश्विनी आरे, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी उपस्थित होते. नाट्यसंस्कार कला अकादमी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम आयोजित केला आहे. यात सहभागी होण्यासाठी 4 जूनपर्यंत 8484930335 या क्रमांकावर what’s app क्रमांकावर मेसेज करता येईल.

आळेकर म्हणाले, स्वत:मधील कलागुण विकसित होण्यासाठी योग्य पद्धतीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी प्रक्षिणाची गरज वाटत नव्हती, पण माध्यमे वाढली तशी स्पर्धाही वाढली त्यामुळे प्रशिक्षणासाठी आग्रह धरला जाऊ लागला.

डॉ. प्रवीण भोळे म्हणाले, नाट्यविषयक अभ्यासक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी अभ्यास केंद्रांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. शिस्तबद्ध पद्धतीने आणि तळमळीने काम करणाऱ्या नाट्यसंस्थांना प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यास विद्यापीठाने मान्यता दिली आहे. नाटक ही सामूदायिक पद्धतीने सादर करायची कला असून नाट्यप्रशिक्षण मिळण्यासाठी योग्य वातावरण तयार करायचे असून सुयोग्य संधी उपलब्ध करून द्यायची आहे.

प्रास्ताविकात प्रकाश पारखी म्हणाले, नाट्यप्रशिक्षणातून व्यक्तीमत्व विकास या धोरणानुसार संस्था काम करीत आहे. नाट्यसंस्कार कला अकादमीत प्रशिक्षण घेतलेले अनेकजण आज विविध क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहेत. अश्विनी आरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रकाश पारखी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन हर्षदा टिल्लू हिने केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading