पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागात विशेष करून प्रभाग क्रमांक ३९ व ४० मधील आंबेडकर नगर, प्रेम नगर, गुलटेकडी, महर्षी नगर डायस प्लॉट येथील वसाहती तसेच सोसायटी भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर पाणीच येत नाही, अशा विविध मागण्यांसाठी पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनास प्रवक्ते अंकुश काकडे प्रदीप देशमुख रवींद्र माळवदकर, भगवानराव साळुंके, संतोष नांगरे मृणालिनी वाणी शशिकला कुंभार विपुल मैसुरकर इत्यादी उपस्थित होते. पुणे महानगरपालिका मिळकत करामधे करण्यात आलेली वाढ मागे घेण्यात यावी व पाण्याची समस्या तात्काळ कायमस्वरुपी सोडवावी अशी यावेळी करण्यात आली.
याबाबत प्रशांत जगताप म्हणाले, अनेकदा संबंधित खात्याकडे तोंडी लेखी तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली नसल्यामुळे महिनाभारांपूर्वी स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढून देखील काढला त्यापूर्वी दोनदा सदर स्वारगेट पाणी पुरवठा ठिकाणी धरणे आंदोलन करुन देखील तात्पुरत्या स्वरूपात तक्रारीचे निरासरण केले जात आहे. परंतु दोन दिवसानंतर पुन्हा त्याच समस्या तक्रारी उद्भवत आहेत.
तसेच पुणे शहरातील ८,००,००० घरांना जी मिळकत करामधे ४० टक्के सवलत देण्यात येत होती ती अचानकपणे पुर्णपणे बंद करण्यात आलेली असल्यामुळे त्याचा अचानक नाहक भार पुणेकरांवर लादण्यात आलेला आहे. अगोदरच कोरोनामुळे मेताकुटीला आलेला पुणेकरांना पुणे महानगर पालिकेच्या वतीने मदत करण्याऐवजी अशी जुल्मी मिळकत कर लादून एक प्रकारे पुणेकरांची लूट सुरु करण्यात आल्याची संतप्त भावना सर्व पुणेकरांमधे पसरलेली आहे. त्याचा पुणेकर म्हणून आम्ही सर्वप्रथम निषेध करीत आहोत. त्यामुळे सदर केलेली मिळकत कर वाढ ही तात्काळ मागे घ्यावी व यामधुन पुणेकरांना सवलत देवुन पुर्वीच्या पध्दतीने मिळकत कर घेण्यात यावा.
