पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव
‘कान्स’ महोत्सवातील फेस्टिवल हब मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळालेला ‘पिफ’ हा भारतातील एकमेव चित्रपट महोत्सव
पुणे : महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फौंडेशनच्या वतीने गेली २० वर्षे पुण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’च्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. येत्या १७ ते २८ मे दरम्यान फ्रान्स येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवातील ‘द फेस्टिवल हब’ या विभागात होणाऱ्या एका विशेष चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ‘पिफ’ला निमंत्रण देण्यात आले आहे. सदर विभागात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळालेला ‘पिफ’ हा भारतातील एकमेव चित्रपट महोत्सव आहे.
पिफ व्यतिरिक्त दक्षिण कोरियातील बुचेओन इंटरनॅशनल फॅनटास्टीक फिल्म फेस्टिवल, झेक प्रजासत्ताक येथील कार्लोव्ही वरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवल या महोत्सवाच्या प्रतिनिधींना देखील या चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आले आहे. ‘द न्यू एरा ऑफ फेस्टिवल्स – ऐक्सपांडिंग बीयौंड हायब्रीड’ या विषयावर असलेले हे चर्चासत्र स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता कान्स महोत्सवातील मरीना स्टेज रिव्हिएरा येथे संपन्न होईल. जगभरातील प्रेक्षकांना यात ऑनलाईन पद्धतीने देखील सहभागी होता येईल.
“गेली २० वर्षे आम्ही घेत असलेल्या अविरत प्रयत्नांना सदर निमंत्रणाच्या रुपात मिळालेली ही दाद आम्हाला भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देईल. महोत्सवाला एका शहरापुरते मर्यादित न ठेवता, पुणे, मुंबई,नागपूर,लातूर,सोलापूर येथे उत्तम दर्ज्याच्या जागतिक आणि प्रादेशिक सिनेमाचा प्रचार आणि प्रसारासाठीची सातत्यपूर्ण कामगिरी, कोरोना काळातील बदलेल्या आव्हानात्मक परीस्थितीला अनुसरून महोत्सवाचे यशस्वी आयोजन आदी बाबींची दखल या निमित्ताने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेण्यात आली आहे याचा आम्हाला विशेष अभिमान आहे”, अशा भावना महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेल्या ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केल्या.
तसेच एक्सटेंडेड फिल्म फेस्टिवल करणारा पिफ हा भारतातील एकमेव फेस्टीव्हल आहे .या उपक्रमाचा फायदा अनेक नवीन दिग्दर्शकांना गाव – जिल्हा पातळीवर झाला आहे असेही डॉ पटेल यांनी आवर्जून नमूद केले.