fbpx
Monday, May 20, 2024
Latest NewsPUNE

आपत्ती व्यवस्थापनात सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची – मुरलीधर मोहोळ

पुणे : “आपत्ती व्यवस्थापन आणि सोशल मीडियाचा संबंध जवळचा आहे, त्याचा प्रभावी उपयोग केल्यास उत्तम आपत्ती व्यवस्थापन करता येऊ शकते,” असे मत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

डिजिटल मीडिया प्रेमी मंडळीतर्फे आयोजित व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंटस् सहआयोजित दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनात सामाजिक कार्यकर्ते तन्मय कानिटकर यांनी मोहोळ यांची ‘पॅन्डेमिक, आपत्ती व्यवस्थापनासाठीचा मीडिया’ या विषयावर मुलाखत घेतली. यावेळी संमेलनाचे आयोजक मंगेश वाघ, समीर आठल्ये आणि प्रदीप लोखंडे उपस्थित होते.

यावेळी मोहोळ म्हणाले, “करोना काळात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी इतर माध्यमांवर काही मर्यादा होत्या. तेव्हा सोशल मीडिया हा संवादाचा उत्तम  व्यासपीठ ठरला. त्यासाठी एक टीम तयार केली होती. मात्र, त्यासाठी आम्ही सगळे जमिनीवर काम करत होतो. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादित करण्यात यश आले. लोकांनीही आम्हाला खूप साथ दिली. अनेकांच्या सूचना, तक्रारी मिळत होत्या. अनेकांना मदत करता आली याचे समाधान वाटते.”

कोविड काळामध्ये शहराचे नागरिक, त्यांचे आरोग्य हेच प्राधान्य माणून, कोणत्याही राजकीय टीका, वादांमध्ये न पडण्याचे ठरवून त्याचे कटाक्षाने पालन केले. मीच नव्हे तर शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी राजकारण केले नाही. त्यामुळे ती परिस्थिती हाताळण्यात चांगले यश आले, असेही मोहोळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading