‘वासंतिक पुष्पोत्सवात’ सजले ‘दगडूशेठ’ दत्तमंदिर

पुणे : विविधरंगी सुवासिक लाखो फुलांनी सजलेला दत्तमंदिराचा परिसर…शोभिवंत फुलांनी साकारलेला महाराजांचा मुकुट… फुलांची आकर्षक आभूषणे…आणि गुलाब, झेंडू, चाफा, लिलीसारख्या नानाविध फुलांनी सजलेल्या दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव उत्साहात साजरा झाला. चैत्र अमावस्येला दत्तमहाराजांकरीता केलेली फुलांची आरास व महाराजांचे फुलांच्या दागिन्यांनी सजलेले मनोहारी रुप पाहण्याकरीता मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सत्तू अमावस्येला पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, गिरनार संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ येमूल गुरुजी यांच्या हस्ते पुष्पोत्सवाचे उद््घाटन झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, सुमारे २५० किलो मोगरा, १०० किलो गुलछडी, १५० किलो झेंडू, ५० किलो गुलाब पाकळ्या, १५००० डच गुलाब, ३००० चाफ्याची फुले, १५ किलो कणेर, आॅर्किड, अशोकाची पाने वापरुन पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही आरास साकारली.

श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांची प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आली. सकाळी विश्वस्त अक्षय हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र झाला. त्यानंतर ट्रस्टच्या संस्थापिका कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते आरती झाली. सायंकाळी सर्वांना कैरीची डाळ व पन्हे असा प्रसाद देण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: