Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

सुमधुर वाद्य वादनातून रंगला ‘वाद्य रंग’

पुणे : तबल्यावर पडणारी थाप, घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि सोबतीला टाळांची नादमय लय अशा संगीतमय वातावरणात विविध प्रकारच्या ताल वाद्यातून ज्येष्ठ तालवाद्य वादक डॉ. राजेंद्र दूरकर यांची वाद्यरंग ही कार्यशाळा रंगली, विद्यार्थ्यांनीही विविध प्रकारच्या वाद्यांचा या कार्यशाळेमध्ये आनंद घेतला. डॉ. राजेंद्र दूरकर यांनी यावेळी ढोलकी, ताशा, हलगी, टाळ डफली, चिपळ्या, डमरू, घुंगरू आदी विविध प्रकारच्या पारंपारिक तालवाद्यांची सखोल माहिती दिली तसेच वाद्यांचे सुमधुर वादन देखील करून दाखवले.

भारती विद्यापीठ स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे वाद्य रंग या मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजेंद्र दूरकर यांनी विविध प्रकारच्या वाद्यांची माहिती देत वाद्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण करून पारंपारिक वाद्य आणि ताल संगीत याची सखोल माहिती दिली. भारती विद्यापीठ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, प्रवीण कासलीकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र दूरकर म्हणाले, संगीत क्षेत्रामध्ये आज मोठी स्पर्धा आहे. केवळ एकच वाद्य वाजवून आपण करिअर करू शकतो हा समज विद्यार्थ्यांनी ठेवू नये. एकापेक्षा अधिक वाद्य वाजविण्याची कला जर आपण आत्मसात केली तर त्यामधून आपल्याला संगीत क्षेत्रामध्ये अधिक संधी मिळू शकतात. आज अनेक वादक आहेत त्यामध्ये आपण काय वेगळे वादन करू शकतो याकडे कलाकारांनी लक्ष दिले पाहिजे. जर आपल्यामध्ये वेगळेपणा असेल तरच आपल्याला आणि आपल्या कलेला संगीत क्षेत्रामध्ये मागणी असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या वाद्यांची माहिती घेणे आवश्यक आहे.

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, तबला आणि ढोलकी यापलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांची ओळख निर्माण व्हावी यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या तालवाद्यांची माहिती असेल तर आपण परिपूर्ण कलाकार घडवू शकतो या भावनेतूनच ही कार्यशाळा घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading