Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

‘नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार’ डॉ. संभाजी मलघे यांना जाहीर

तळेगाव दाभाडे : नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्यावतीने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व संवेदनशील कवी डॉ. संभाजी मलघे यांना मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा ‘कविवर्य नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या १ मे रोजी कामगारदिनी नेरळ येथे आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनात सुप्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांच्या हस्ते डॉ. मलघे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे. तसेच ज्येष्ठ कवी उद्धव कानडे व पुरुषोत्तम सदाफुले लिखित ‘कविवर्य नारायण सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष सुदाम मोरे, रिलायन्स उद्योग समूहाचे माजी उपाध्यक्ष रवींद्र आवटी, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.
डॉ. संभाजी मलघे यांनी कथा, कविता, कादंबरी, समीक्षा या माध्यमातून केलेले लेखन महत्त्वाचे आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे इंद्रायणी महाविद्यालयाचा गौरव आहे, असे त्यांनी म्हटंले आहे.

दरम्यान, पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांना, पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार लेखिका व अभिनेत्री प्रा. नेहा सावंत यांना, मास्तरांची सावली सन्मान पुरस्कार प्रा. लीला फ. शिंदे यांना, नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading