‘इंजिनिअस’ प्रदर्शनातून विद्यार्थ्यांंमधील प्रयोगशीलतेला प्रोत्साहन

पुणे : इतिहास-भूगोल साठी मॅझेटिक बोर्डस, विज्ञानातील सोपे प्रयोग, गणितातील अंकांचे खेळ, इंग्लिश हिंदी व मराठी विषयांसाठी भाषा विषयक अनेक गमतीशीर खेळ, छोट्यांसाठी सॉफ्ट टॉईज पपेट शो दृक श्राव्य माध्यमातून अनेक कथा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त क्रांतिवीरांची व भारतीय भाषा, वेशभूषेची माहिती देणारी रंगावली तसेच मॉडेल्समधून विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न इंजिनिअस प्रदर्शनातून करण्यात आला. एस.पी.एम.इंग्लिश स्कूलमधील शाळेच्या इमारतीच्या पाच मजल्यांसह २० हून अधिक वर्गखोल्या व जिन्यांमध्ये देखील हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

शि.प्र. मंडळीच्या एस. पी. एम इंग्लिश स्कूल, सदाशिव पेठ, पुणे प्रि प्रायमरी आणि प्रायमरी विभाग यांच्यातर्फे शालेय शैक्षणिक साधनांचे इंजिनिअस हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन शि.प्र. मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी शि.प्र. मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समिती सदस्य मिहीर प्रभुदेसाई, सुधीर काळकर, राजेंद्र पटवर्धन, अशोक वझे, सतिश पवार, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांसह कार्यवाह अनिता लागू व कविता किंगर यांनी केले.

रमा कुलकर्णी म्हणाल्या, मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांना विविध प्रकारे विषयांचे आकलन व्हावे हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांची जिज्ञासू वृत्ती वाढावी त्यांनी स्वत: प्रयोगशील बनावे काही गोष्टी त्यांनी आपल्या हातानी करून बघाव्यात, त्यासाठी त्यांना अनेक वस्तू हाताळता याव्यात अनेक खेळ खेळता यावेत व आपल्या समवयिन मुलांशी छान बांधिलकी तयार व्हावी, अशा पद्धतीच्या शैक्षणिक साधनांचा यात समावेश केला आहे.

मिनी केजी ते पाचवी पर्यंतच्या सर्व वर्गाच्या सर्व विषयांचा यात समावेश केला आहे. प्रदर्शनाकरीता पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी तसेच कर्मचा-यांनी तीन महिने मेहनत घेतली. हे प्रदर्शन शनिवार, दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळात सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: