स्नेहल तरडे साकारणार “सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते”

 ‘रियल लाईफ’ जोडी आता ‘रील लाईफ’मध्येही एकमेकांना देणार साथ

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित, भव्यदिव्य ऐतिहासिक “सरसेनापती हंबीरराव” या सिनेमाच्या आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरने स्नेहल तरडे या छत्रपती ताराराणी यांच्या मातोश्री “सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते” यांची भूमिका साकारत आहेत हे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. त्यामुळे या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राला प्रविण तरडे आणि स्नेहल तरडे हे रियल लाईफ जोडी आता ‘रील लाईफ’मध्येही एकमेकांना साथ देताना पाहायला मिळणार आहेत.

स्नेहल तरडे या कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धेसाठी सीलेक्ट झालेल्या एका मैत्रिणी बरोबर सहजच प्रॅक्टिस बघायला गेल्या पण तिथे त्यांची ऑडिशन घेतली गेली आणि त्यांना भूमिका मिळाली. मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार पटकावला. या स्पर्धेबरोबरच त्यांनी इतर विविध नाट्य स्पर्धा 30 पेक्षा जास्त पारितोषिके मिळवून गाजवल्या. पुढे अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये तसेच ‘अभिमान’ आणि ‘तुझं माझं जमेना’ या टीव्ही सिरीयलमध्ये काम केले. लग्नानंतर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर शाळा, चिंटू, चिंटू २, देऊळ बंद, मुळशी पॅटर्न यांसारख्या दर्जेदार चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली तसेच काही काळ पोलीस खात्यात सेवा रूजू केली. बाहुबली आणि बाहुबली 2 या मराठीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे अनुरूप मराठी संवाद लेखन स्नेहल यांनी केले आहे. स्नेहल यांना भाषेची आवड असल्याने त्यांनी मराठी बरोबरच फ्रेंच आणि संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले आहे व सध्या त्या वेद अध्ययन करत आहेत. अशा या बहुआयामी आणि अष्टपैलू कलाकार स्नेहल तरडे यांनी “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटात सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते यांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’  हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: