काळभैरव, बाणेर युवा, राणाप्रताप संघांची आगेकूच

हिंदूहृदसम्राट चषक जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

पुणे  : काळभैरव, बाणेर युवा, राणाप्रताप  संघांनी पूना अँमच्युअर्स कब्बडी संघटना, शिवसेना कसबा यांच्या वतीने हिंदूहृदसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या हिंदूहृदसम्राट चषक जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. 

काळभैरव रहाटणी संघाने श्रीकृष्ण, बाणेर संघाला ३२-२० असे १२ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मध्यंतराला श्रीकृष्ण संघाने १३-१२ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र आर्यन राठोड, महेश शिरसाठ, प्रतीक नखाते यांनी आपला खेळ उंचावताना काळभैरव संघाला विजय मिळवून दिला. पराभूत श्रीकृष्ण संघाकडून हृषिकेश पाटील, शाशिराज पाटील यांनी चांगली लढत दिली. 

सरनौबत नरवीर पिलाजी गोळे संघाने लोणकर माध्यमिक विद्यालय संघाला २४-१८ असे ६ गुणांनी पराभूत केले. निलेश चव्हाण, पवन पाटील व तुषार सुरवसे यांनी आक्रमक खेळ करताना लोणकर विद्यालय संघाला मध्यंतराला १२-७ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर पिलाजी गोळे संघाने अनिकेत शिंदे, आदित्य शिंदे, मनीष पवार यांनी आक्रमक चढाया करताना संघाला विजय मिळवून दिला. 

बाणेर युवा, बाणेर संघाने अभिजितदादा कदम पुणे संघाला १६-१५ असे एका गुणाने पराभूत केले. अभिजितदादा कदम संघाने मध्यंतराला ६-५ अशी एका गुणाची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र बाणेर संघाने खेळ उंचावताना विजय साकारला. विजयी संघाकडून किरण सुरवसे, तेजस सायकर, वरद साळवे यांनी तर पराभूत संघाकडून कुणाल पवार, दीपक शर्मा यांनी चांगला खेळ केला.

राणाप्रताप, कळंब संघाने संघर्ष पुणे संघाला २०-११ असे ९ गुणांनी पराभूत केले. राणाप्रताप संघाने मध्यांतराला १५-३ अशी आघाडी घेतली. विजयी संघाकडून साहिल चव्हाण, जयंत अर्जुन, आदित्य गोरे यांनी तर पराभूत संघाकडून शुभम पाटील यांनी सुरेख खेळ केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: