fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

पुणे :दुसरे मराठी सोशल मीडिया संमेलन २९ एप्रिल ते १ मे दरम्यान पुण्यात होणार असून या तीन दिवसीय संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली. डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी या संस्थेच्या वतीने हे संमेलन होत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस, गणेशखिंड येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे कार्यक्रम पार पडतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होत असलेल्या संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. मोफत ऑनलाइन नावनोंदणी www.thesammelan.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून करता येईल.

कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवारी (२९ एप्रिल) सकाळी ११ वाजता होणार असून यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी उदय सामंत (उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री), सतेज पाटील (माहिती व तंत्रज्ञान राज्य मंत्री), यशोमती ठाकूर (महिला व बालविकास मंत्री), अदिती तटकरे (माहिती आणि जनसंपर्क राज्य मंत्री), विनोद तावडे (माजी मराठी भाषा मंत्री), गिरीश बापट (खासदार), सिद्धार्थ शिरोळे (आमदार), मधुरा बाचल (मधुराजे रेसिपी युट्युब रेसिपी), सूमन धामणे (आपली आजी युट्युब रेसिपी), नितीन करमळकर (कुलगुरू), एन. एस. उमराणी (प्र- कुलगुरू), राजेश पांडे (व्यवस्थापन परिषद सदस्य), डॉ. प्रफुल्ल पवार (कुलसचिव), सतीश मगर (मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालक), अक्षय बर्दापुरकर (प्लॅनेट मराठी सीईओ), केदार चितळे (संचालक, चितळे बंधू मिठाईवाले) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उदघाटनानंतर मुख्य कार्यक्रमांना सुरुवात होईल. यामध्ये ‘समाज माध्यमाची दिशा आणि दिशांतरे’ या विषयावर परिसंवाद होणार असून दैवता चव्हाण-पाटील आणि नितीन वैद्य यांची व्याख्याने आहेत. त्यानंतर ‘माझं एक्स्प्रेशन, माझं इम्प्रेशन’ या विषयावर चर्चासत्र होणार असून यावेळी जुही देशमुख, स्वामीराज भिसे, दिया ओस्तवाल, डॉ. मानसी भट हे सहभागी होणार असून मुकुल जोशी सूत्र सांभाळणार आहेत. ‘सायबर क्राइमः रिपोर्ट करा, कायदा आहे’ या विषयावर सोनाली पाटणकर, संजय शिंदे, वैशाली भागवत चर्चासत्र होणार असून उन्मेष जोशी सूत्रधार असतील. यानंतर ‘महाराष्ट्राच्या राजकारणातला सोशल मीडिया’ या विषयावर परिसंवाद होणार असून यशोमती ठाकूर, अदिती तटकरे, रोहित पवार, योगेश कदम, सिद्धार्थ शिरोळे, देवेंद्र भुयार सहभागी होणार आहेत. उज्ज्वला बर्वे सूत्रसंचालन करतील. त्यानंतर कविता सादरीकरणाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये कल्पना दुधाळ, आश्लेषा महाजन, पवन नालट, रश्मी यमकनमर्डी, प्रदीप कोकरे, कलमेश कुमार महाले हे कविता सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचा दुसऱ्या दिवशी, शनिवारी (३० एप्रिल) विविध विषयांवर व्याख्याने होतील. यामध्ये ‘व्यक्त होण्यापूर्वी आणि होताना’ या विषयावर अरविंद जगताप बोलतील. त्यानंतर डॉ. संजय रानडे ‘कंटेंट कडक्क होण्यासाठी…’ या विषयावर व्याख्यान देतील. त्यानंतर ‘आग्रह-दुराग्रहाच्या पल्याड भाषा व सोशल मीडिया’ या विषयावर डॉ. प्रभाकर देसाई बोलणार आहेत. ‘हजारो लाइक्स, कॉमेंट्सः कसं काय?’ या विषयावर सॅबी परेरा बोलतील. ‘सकारात्मक ट्रॅक्शनचा ट्रॅक’ या विषयावर डॉ. सलील कुलकर्णी बोलतील. ‘शेकडो बदामवाली कविता’ या विषयावर चर्चासत्र होणार असून पूजा भडांगे याची सूत्रे सांभाळणार आहेत. वैभव जोशी आणि पवन नालट त्यात सहभागी असतील. ‘स्टोरीचा फोटो व हजार लाइक्सची फ्रेम’ या विषयावर अभय कानविंदे बोलतील. ‘मीमः टेंप्लेटच्या अलीकडले आणि पलीकडले’ या विषयावर आशिष शिंदे आणि शशांक प्रतापवार यांची मुलाखत होणार असून आरजे राहुल ही मुलाखत घेणार आहे. ‘व्हिडीओ कंटेटचा किडा’ या विषयावर जीवन कदम, मेघा पवार, नीतेश कराळे हे चर्चा करणार आहेत. त्यानंतर ‘रील लाइफ’ या विषयावर परिसंवाद होणार असून अथर्व सुदामे, डॅनी पंडित, मृणाल दिवेकर, गौरी पवार हे सहभागी होणार आहेत. ‘कंटेटचं सीमोल्लंघन’ या विषयावर जयंती वाघधरे यांचे व्याख्यान होईल. दुसऱ्या दिवसाचा समारोप ‘अभंग रिपोस्ट’ या कार्यक्रमाने होईल.

रविवारी (१ मे) रोजी ‘ग्रुप डायनॅमिक्स’ या विषयावर सोनिया अगरवाल आणि विनम्र भाबल हे सादरीकरण करतील. त्यानंतर ‘सांस्कृतिक वारसा, आपण आणि सोशल मीडिया’ या विषयावर अर्चना देशमुख, हेमंत राजोपाध्ये आणि सचिन पवार चर्चा करणार आहेत. ‘चळवळींचा मीडिया’ या विषयावरील परिसंवादात सोनाली नवांगुळ, असीम सरोदे, परिणीता दांडेकर, शमीभा पाटील सहभागी होणार असून वैभव छाया सूत्र सांभाळणार आहेत. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितांना लाइव्ह मार्गदर्शन करतील. ‘पॅन्डेमिक, आपत्ती व्यवस्थापनासाठीचा मीडिया’ या विषयावर मुरलीधर मोहोळ यांची मुलाखत होणार असून तन्मय कानिटकर हे मुलाखत घेतील. ‘पत्रकारिता आजची आणि उद्याची’ या विषयावर राजदीप सरदेसाई, आशिष दीक्षित, प्रसन्न जोशी, अभिजीत कांबळे हे संवाद साधतील. मयुरेश कोण्णुर सूत्रधार असतील. यानंतर कार्यक्रमाचा सांगता समारोप होणार असून यावेळी विश्वजित कदम (राज्य मंत्री-मराठी भाषा विभाग) आणि नितीन करमळकर (कुलगुरु) यांची उपस्थिती असेल. त्यानंतर ‘तुका आकाशा एवढा’ या कार्यक्रमाने संमेलनाचा समारोप होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading