समतेचा एल्गार नाटक “लोक – शास्त्र सावित्री”
थिएटर ऑफ रेलेवन्सचे शुभचिंतक आणि प्रयोगकर्ते समता, बंधुता आणि शांततेचा संकल्प करीत ‘ महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कणा व वैचारिक प्रगतीशीलतेचा’ वारसा जगणारे, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटक “लोक-शास्त्र सावित्री” 29 एप्रिल 2022, शुक्रवार रोजी, संध्याकाळी 5.30 वाजता, बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे प्रस्तुत करणार आहेत !
यामध्ये अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, नृपाली जोशी, संध्या बाविस्कर, आरोही बाविस्कर, तनिष्का लोंढे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार !प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.
1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, “थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत” “लोक- शास्त्र सावित्री” या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.
भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. भारतात आज सावित्रीच्या पुढाकाराने शिकले,
पण सवित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा ! माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक वैचारिक प्रहार करते.
कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते. म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे सृजनकार या भूमिकेला अंगीकारण्याची ही वेळ आहे. मानवतेसाठी व विश्वाच्या कल्याणासाठी सृजन करणारा सृजनकार काळासोबत लढतो. आपला नवीन काळ निर्माण करतो. “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाटयसिध्दांताचे “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक युगपरिवर्तनाचा काळ रचते.
