कोणत्याही परिस्थितीत नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवा!

पुणे : कोणत्याही परिस्थितीत कोथरुड मतदारसंघातील नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नव्या उड्डाणपूलामुळे नळस्टॉप चौकातील ७५ टक्के वाहतूक सुरळीत झाली असून, केवळ संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी  चंद्रकांत  पाटील यांनी आज नळस्टॉप चौकाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, मनपा वाहतूक नियोजन विभागाचे श्रीनिवास बोनाला, मेट्रोचे गौतम बिऱ्हाडे, मनपा पथविभागाचे अभिजीत डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, कर्वे रोड व्यापारी संघाचे ओमप्रकाश रांका, राजू भटेवरा कोथरुड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ व इतर नागरीक उपस्थित होते.

दीर्घकालीन उपाययोजनेत बालभारती पौंड फाटा रस्ता झाल्यावर, कोथरूडकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. हे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाशी सतत संपर्कात आहोतच, मात्र तोपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी आज सर्व बाजूने विचार करुन अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. असे आ. चंद्रकांतदादा पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

यात प्रामुख्याने मेट्रोचे सर्वत्र पडलेले सामान व राडारोडा तातडीने उचलून रस्ता मोकळा करणे, पदपथ सुस्थितीत करणे, शक्य तिथे रस्त्याचे रुंदीकरण करणे, तसेच बस आणि अवजड वाहने उड्डाणपुलावरुनच जातील अशी व्यवस्था करणे, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बस स्टॉपच्या जागा तातडीने बदलणे, नळस्टॉप चौकातील सिग्नलच्या वेळेचे नियोजन करणे, आदी उपाययोजना आगामी दहा दिवसांत करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: