आव्हाडांचं ट्विट, म्हणाले राष्ट्रपती राजवट लावा…लै

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री एक वाजून एक मिनिटांनी केलेलं एक ट्विट देशभर चर्चेचा विषय झाले आहे. सहा शब्दांचं ट्विट आव्हाड यांनी केल्यानंतर राज्यात नव्हे तर देशात चर्चेला उधाण आले आहे. नेमका या ट्विटचा संदर्भ काय आहे? आव्हाड यांनी असं का म्हटलं आहे, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आणि सामान्यांमध्ये रंगली आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार यांचे निकटवर्तीय असणाऱ्या आव्हाडांनी असं ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन 25 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच आज रात्री एक वाजून एक मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी म्हटले आहे की, “राष्ट्रपती राजवट लावा… लै मजा येईल” असं सहा शब्दांचं ट्विट आव्हाड यांनी केलंय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील प्रश्न दोन दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली होती. “तुम्हाला वाटतं का राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आलेली आहे?” असा प्रश्न पत्रकाराने पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या पोटात इतकी भीती आहे की काहीही झालं की त्यांना राष्ट्रपती राजवट आठवते,” असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आम्ही काही राष्ट्रपती राजवटीची मागणीही केलेली नाहीय. आम्ही व्हाया राज्यपाल राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं नाहीय. पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं नाहीय,” असं सांगितलं. त्याचप्रमाणे, “राणाजी कशाला सामान्य माणसालाही अधिकार आहे की त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी,” असंही पाटील म्हणाले. “आम्ही काही अशी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. त्याचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: