वाघेश्र्वर स्पोर्ट्स क्लब, सुवर्ण स्पोर्ट्स, हडपसर संघांची विजयी सलामी

हिंदूहृदसम्राट चषक जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा :

पुणे : वाघेश्र्वर स्पोर्ट्स क्लब, सुवर्ण स्पोर्ट्स, हडपसर संघांनी पूना अँमच्युअर्स कब्बडी संघटना, शिवसेना कसबा यांच्या वतीने हिंदूहृदसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ४८ व्या कुमार – कुमारी गटाच्या हिंदूहृदसम्राट चषक जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

नेहरू स्टेडियम येथे आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक विशाल धनवडे, आयोजक उमेश गालिंदे, शहर समन्वयक गजानन पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप गायकवाड, विभागप्रमुख चंदन साळुंखे, अमृता गायकवाड, स्वाती कत्तलकर, अनिल ठोंबरे, देवेंद्र शेळके, गोरख बांदल, प्रतीक गालिंदे, जय गालिंदे ओंकार मालुसरे, गौरव नवले, सूरज मालुसरे, अनिकेत उत्तेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वाघेश्र्वर स्पोर्ट्स क्लब संघाने साहेबराव सातकर संघाला ४५-११ असे पराभूत करताना विजय साकारला. वाघेश्र्वर संघाने सुरुवातीपासून जोरदार आक्रमण करताना मध्यंतरापर्यंत ४-१९ अशी १५ गुणांची मोठी आघाडी घेतली होती. वाघेश्र्वर संघाच्या दीपक सांगळे व शुभम सातव यांनी जोरदार चढाया करताना संघाला विजय मिळून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सातकार संघाच्या वेदांत राक्षेने चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या लढतीत सुवर्ण स्पोर्ट्स, हडपसर संघाने कोहिनूर क्रीडा मंडळ संघाला ३७-१८ असे १९ गुणांनी पराभूत केले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. मध्यंतराला कोहिनूर संघाने १२-११ अशी एक गुणाची आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सुवर्ण स्पोर्ट्स संघाने जोरदार आक्रमण व पकडी करताना ही लढत १९ गुणांच्या फरकाने जिंकली. सुवर्ण स्पोर्ट्स संघाकडून सौरभ शिंदे व निखिल बुधवंत यांनी तर कोहिनूर संघाकडून भावेश गोरळे यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: