पीएमपीएमएलच्या “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” या नाविन्यपूर्ण उपक्रमास पुणेकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे : पीएमपीएमएल च्या १५ व्या ‘वर्धापन दिनानिमित्त’ या आठवडय़ात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पीएमपीएमएल चा आजपर्यंतचा इतिहास, पीएमपीएमएल च्या विविध बससेवा व विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” (फिरते प्रदर्शन) या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक  लक्ष्मीनारायण मिश्रा व पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांच्या शुभहस्ते शुक्रवार, दि. २२ एप्रिल २०२२ रोजी पीएमपीएमएल च्या मुख्य प्रशासकीय इमारत स्वारगेट येथे बसेसना हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

पीएमपीएमएल व्दारे पुरविल्या जाणाऱ्या विविध बससेवांची तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून दोन बसेस मध्ये ‘फिरते प्रदर्शन’ तयार करण्यात आले आहे. “बस फॉर अस” फाऊंडेशनचे प्रतिनिधी व पीएमपीएमएल च्या स्वारगेट मध्यवर्ती यंत्रशाळेतील कर्मचारी यांनी त्यांचे कौशल्य व अनुभवाच्या जोरावर फिरते प्रदर्शनाकरीता दोन बसेस मध्ये अप्रतिम अशी मांडणी केली आहे. पीएमपीएमएलच्या पुणे दर्शन, पुण्यदशम, अभि एअरपोर्ट बससेवा, रातराणी, विशेष (प्रासंगिक करार) बस सेवा,  पुष्पक, तेजस्विनी, स्मार्ट एसी ई बस, रेनबो बी.आर.टी., अटल शटल आदी लोकल्याणकारी बस योजनांची माहिती या ‘फिरत्या प्रदर्शनाच्या’ माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सिल्व्हर ज्युबिली मोटर्स, पी.एम.टी. व पी.सी.एम.टी. ते पीएमपीएमएलचा आजपर्यंतचा वेगवेगळ्या टप्प्यातील इतिहास ‘फिरते प्रदर्शना’ च्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.


प्रदर्शन बस तयार करण्यासाठी पीएमपीएमएलचे चिफ मेकॅनिकल इंजिनिअर सुनील बुरसे, झोनल मॅनेजर  कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली पीएमपीएमएल च्या स्वारगेट मध्यवर्ती यंत्रशाळेतील कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच “बस फॉर अस” फाऊंडेशनचे  रोहित धेंडे,  आदित्य राणे व त्यांच्या टीमने “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सहकार्य केले. या “एक्झिबिशन ऑन व्हिल्स” (फिरते प्रदर्शन) चा लाभ पुणे व पिंपरी चिंचवड शहरवासियांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: