इपटेक्स आणि ग्राईंडेक्सच्या प्रदर्शनातून मेड इन इंडियाला चालना मिळेल : अनिता रघुनाथ

पिंपरी : मागील दोन वर्षांपासून कोविड मुळे औद्योगिक उत्पादन आणि विक्री यावर विपरीत परिणाम झाला होता. आता औद्योगिक उत्पादनाची मागणी वाढत आहे. इपटेक्स आणि ग्राईंडेक्सच्या प्रदर्शनातून मेड इन इंडियाला आणि रोजगार वाढीसह स्टार्ट अपला अधिक चालना मिळेल असे प्रतिपादन वरगो कम्यूनिकेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता रघुनाथ यांनी केले.
गिअर टेक्नॉलॉजी, मॅकेनीकल पावर ट्रान्समिशन, ग्राईंडेक्स टेक्नॉलॉजी आणि सरफेस फिनिशिंग प्रोसेस यातील नव तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना याबाबत एकत्रित माहिती देणारे तीन दिवसांचे इपटेक्स २२ आणि ग्राईंडेक्स या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. २१ एप्रिल) चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे अनिता रघुनाथ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एएसएम साऊथ ईस्ट आशिया मेट्रिक्स प्रेसिजनचे अरुण सामल, उद्योजक कनसारा, सोनल धर, रोहित परेरा, कदम तसेच देश विदेशातून विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून याचा समारोप शनिवारी (दि. २३ एप्रिल) रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
यावेळी अनिता रघुनाथ म्हणाल्या की, या प्रदर्शनातून मागील तीन वर्षातील नवीन संशोधन, संकल्पना आणि उत्पादनाची माहिती मिळणार आहे. उत्पादक, व्यवस्थापन आणि सेवा यांचा योग्य समन्वय यामुळे साधला जाईल. नवीन उद्योजकांनी आणि स्टार्ट अप करणाऱ्यांनी अशा प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. यातूनच नवीन उद्योजक घडतील आणि देशाच्या मेड इन इंडियाच्या धोरणाला चालना मिळेल असा विश्वास अनिता रघुनाथ यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनात गिअर आणि ग्राईंडेक्सशी संबंधित ४५ हून जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात नवनविन प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादक, वितरक आणि अभियंत्यांचा योग्य समन्वय साधला जाणार आहे. इपटेक्सचे सातवे आणि ग्राईंडेक्सचे पाचवे प्रदर्शन आहे.
जर्मनी, तैवान, युनायटेड किंगडम, अमेरिका, स्वित्झर्लंड, इटली, कोरिया, चायना या देशातून आलेल्या कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. प्रदर्शनात ४७ पेक्षा जास्त विविध उत्पादन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटी देऊन आपल्या उद्योगांचा आलेख उंचावला आहे. ग्राईंडेक्स टेक्नॉलॉजी आणि सरफेस फिनिशिंग प्रोसेसची सर्व माहिती एकाच छताखाली देणारे भारतातील हे एकमेव प्रदर्शन आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: