भोंग्या बाबत राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करू – मुस्लीम समाज
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यावरुन राज्य सरकारला 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला असल्याने सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यातही आपल्या या अल्टिमेटचा पुनरुच्चार केला होता. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारच्या नियमांचे पालन केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पी.ए.इनामदार म्हणाले की, आम्ही दिवसभरात पाच वेळा नमाज पठण करतो आणि त्याचवेळी अजान होते. ही अजान सात ते आठ मिनिटांसाठी असते. पण तरीदेखील सध्या जे काही सतत भोंगे किंवा स्पीकरबाबत आवाहन केले जात आहे. त्याचा विचार करता न्यायालय आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे यापुढील काळात पालन केले जाईल. आम्ही या नियमांची अंमलबजावणी करणार आहोत.
दरम्यान, पुणे शहरात जवळपास ४०० ते ४५० मशिदी आहेत. तेथील भोंगे किंवा स्पीकरबाबत नोंदणी करण्यासाठी अर्ज देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजवर आपण सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केले आहेत. यापुढे देखील साजरे करुयात, असेही ते म्हणाले.
इनामदार म्हणाले की, की निवडणुका जवळ आल्या म्हणून या गोष्टी होत आहेत. मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. मंदिरातील विश्वस्तांनीही यात सहभागी व्हावे. शांतता नांदली पाहिजे. वितुष्ट असता कामा नये, म्हणून ही बैठक होती. कायदेशीर जी तरतूद आहे तो निर्णय आम्ही घेऊ. अल्टीमेटम महत्त्वाचा नाही, कायदा महत्त्वाचा आहे. नियम आहेत तर नियम पाळले पाहिजेत. वातावरण खराब होईल. असे काहीही करू नका. वादासारखे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आम्ही पुण्यात कोणताही अनूचित प्रकार घडू देणार नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले