कला कोणतीही असो कलाकार होण्यासाठी रसिकांची गरज असते – अभिनेत्री दिव्या सेठ – शहा

महिला कलाकारांच्या ‘मॉन्टेज : एक पेंटिंग प्रदर्शन’चे उद्घाटन 

पुणे : कला कोणतीही असो पेटींग, अभिनय, नृत्य, गायन पण चार भींतीच्या आत आपण कलाकार होवू शकत नाही. त्या कलाकारांच्या कलेला नावाजण्यासाठी प्रेक्षकांची, रसिकांची गरज असते. कलाकार हा नेहमी काम करत राहतो. पण जोपर्यंत त्याची चर्चा होत नाही तोपर्यंत त्या कलाकाराला ओळख मिळत नाही. तुमची कला रासिकांपर्यंत पोहोचली तर लोकं त्यावर आपल्या प्रतिक्रिया देतात. काही सूचना करतात, प्रश्न विचारतात. यातून कलाकाराला पुढे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सेठ – शहा यांनी व्यक्त केले.

पुण्यातील तीन महिला कलाकारांच्या ‘मॉन्टेज’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज अभिनेत्री दिव्या सेठ – शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रख्यात चित्रकार अजय देशपांडे, चित्रकार अर्चना चौगुले, नीना सिंग आणि शिल्पा लडकत आदी उपस्थित होते.

चित्रकार अजय देशपांडे म्हणाले की, कलाकाराने आनंद घेत आपले काम सतत करत राहिले पाहिजे. अन् आपली वाटचाल काशी चाललेली आहे, हे पहायचे असेल तर आपण केलेले काम लोकांसमोर ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. आजच्या या तिन्ही कलाकारांची पार्श्वभूमी ही वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांना कसे मार्गदर्शन करायचे हे माझ्यापुढे आव्हान होते. पण आज त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली असून मला त्यांचा अभिमान आहे.

चित्रकार अर्चना चौगुले, नीना सिंग आणि शिल्पा लडकत या तिन्ही कलाकारांना अजय देशपांडे यांनी एकत्रितपणे व्यावसायिक कला प्रवासासाठी मार्गदर्शन केले आहे. अर्चना चौगुले या अभियंता असून कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर त्यांनी कलाप्रवासाला सुरूवात केली. तर नीना सिंग या एक कलाकार, लेखिका, कला संरक्षक, कला समीक्षक, शिक्षणतज्ज्ञ आहेत. तसेच शिल्पा लडकत या कला शाखेतील पदवीधर असून निसर्ग चित्र रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे.

‘मॉन्टेज : एक पेंटिंग प्रदर्शन’ हे बालगंधर्व रंगमंदिर कलादालन येथे 23 एप्रिल 2022 पर्यंत आहे. सकाळी 11 ते रात्री 8 यावेळेत रसिकांना हे विनामूल्य पाहता येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: