मुळा-मुठा नदीकाठ विकसन च्या प्रारूपावर नागारिकांच्या सूचना पालिका मागवणार

पुणे :महापालिकेकडून तब्बल साडेचार हजार कोटींचा खर्च करून मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यात आला. याच्या दोन निविदांना मान्यता देण्यात आली असून त्यासाठीचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्यासोबतच हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे. याची धावती माहिती पुणेकरांना व्हावी या उद्देशाने महापालिकेकडून दोन प्रारूप (मॉडेल) तयार केली जाणार आहेत.

संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यातील कामापैकी येरवडा येथील शादलबाबा दर्ग्यामागील 200 मिटर नदीकाठ आणि दुसऱ्या टप्प्यातील कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर दरम्यानच्या 250 मीटरचा नदीकाठ प्रारूप म्हणून विकास केला जाणार असल्याची माहिती प्रभारी महापालिका आयुक्‍त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली. सुधार योजनेतील नदीच्या काठाव महापालिकेकडून मुळा-मुठा संवर्धनासाठी जायका प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात नदी प्रदूषण मुक्‍त केली जाणार आहे. त्यासोबतच नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यात येत असून सुमारे 44 किलो मीटरचा हा प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचे भूमीपूजनही मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. दरम्यान या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचे गंभीर परिणाम होतील, पुण्याला पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे यावर अभ्यास करणे गरजेचे आहे, असा आक्षेप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. त्यानंतर पर्यावरण प्रेमी संघटना, जलसंपदा विभाग व महापालिकेच्या बैठका सुरू झाल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेले नसले तरी, काम देण्यात आलेल्या कंपनीकडून नदीकाठचे सर्वेक्षण तसेच तांत्रिक कामे सुरू झाली आहेत. त्याचा आढावा नुकताच घेण्यात आला. हा प्रकल्प नागरिकांना समजणे आवश्‍यक आहे. त्यासाठी डेमो तयार करावा अशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार, हे दोन प्रारूप तयार करण्यात येणार असल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले. पिचिंग, त्याला बसवलेली जाळी, पायथ्याशी भिंत, सायकल ट्रॅक, रस्ता, वृक्षारोपण, नागरिकांना बसण्यासाठीची सुविधा यासह इतर सुशोभिकरण अशी कामे केली जाणार असून या प्रारूपावर नागारिकांच्या सूचनाही मागविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: