Friday, June 5, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

पुणेकरांनी घेतला फिरत्या रिक्षावरील सिनेमाचा आस्वाद

पुणे : उन्हाचा पारा उतरल्यानंतरची, हवेत गारवा असलेली संध्याकाळ, ‘बोट क्लब रोड’वरील ‘ग्योथे इंस्टिट्यूट’च्या रम्य वास्तूचे मोकळे पटांगण, पॉपकॉर्न, आणि विशेष म्हणजे चक्क रिक्षाच्या मागच्या बाजूस लावलेला सिनेमाचा पडदा. अशा मोकळ्या, हवेशीर वातावरणामध्ये पुण्यातील सिनेरसिकांनी गेल्या शनिवारी कलात्मक सिनेमाचा आस्वाद घेतला.

‘रिक-शो’ या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पामुळे ही पर्वणी पुणेकरांना मिळाली. रिक्शाच्या माध्यमातून फिरत्या सिनेमाची ही संकल्पना फ्रेंच कलाकार ले जॉन्टी गॅरसोन (जे ‘द नाईस गाय’ या नावानेदेखील ओळखले जातात) यांनी त्रिवेंद्रम येथील ‘कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या सहकार्याने विकसित केली आहे. ‘अलियाँस फ्राँसेसदे पुणे’, ‘ग्योथे इन्स्टिट्यूट, पुणे’ आणि ‘टिआयएफए वर्किंग स्टुडिओ’यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

रिक-शो’विषयी माहिती देताना अलियाँस फ्राँसेस पुणे’च्या संचालिका अॅडल स्पाईसेर म्हणाल्या, ‘हा प्रकल्प तीन महिने भारतभर राबविला जाणार आहे. केरळमधून सुरू होऊन तो आता पुण्यात आला आहे. येथून तो पश्चिम बंगालमध्ये नेण्यात येईल.” फिरत्या सिनेमासाठी वाहन म्हणून रिक्षाच्या निवडीबाबत त्या म्हणाल्या, “गॅरसोन यांना ‘अलियाँस फ्राँसेस’नेखुल्या जागेत कलाकृती दाखवता येतील, अशा प्रकल्पाचा विकास करण्याबाबत२०२०मध्ये विचारणा केलीहोती. ते म्हणाले की रिक्शा हे भारतातील सोयीस्कर व लोकप्रिय प्रवासाचे माध्यम आहे. या विचारातून रिक्शा हे माध्यम निवडण्यात आले.”गॅरसोन हे अष्टपैलू कलाकार असून, चित्रकला, शिल्पकला, सादरीकरण, नावीन्यपूर्ण उपकरणे, व्हिडिओ अशा वैविध्यपूर्ण कलामाध्यमांतून ते विविध विषयांना अनोख्या शैली वापरुन हात घालतात.

‘अलियॉस फ्रॉसेस, त्रिवेंद्रम’तर्फे ‘बौंजोर इंडिया’चे डिझाईन सल्लागार असलेले जीत जोसेफ म्हणाले, “सिनेमा दाखविण्यासाठीची सर्व उपकरणे – पडदा, लाऊड स्पीकर, प्रोजेक्टरव प्रेक्षकांसाठी खुर्च्यासुद्धा -आम्ही चार डब्ब्यांमध्ये बसतील अशा पद्धतीने डिझाईन केल्या. ही सर्व उपकरणे आम्ही रिक्षातून जागोजागी नेतो. रिक्षाच्या मागेच पडदा लाऊन मग चित्रपट दाखवतो.” प्रकल्पाचेसामाजिक उद्दिष्ट स्पष्ट करताना जोसफ म्हणाले, “गॅरसोन यांची संकल्पना अशी आहे, की समाजातील वंचित घटकांना, ज्यांना सिनेमगृहात जाता येत नाही, त्यांच्यापर्यंत सिनेमा घेऊन जाणे. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही हे करणार आहोत.”

‘रिक-शो’मधील चित्रपट व व्हिडिओ ‘कंटेपररी आर्ट फंड ऑफ द सिटी ऑफ जिनिव्हा’ व ‘फंड ऑफ कंटेपररी आर्टऑक्सीटेन-मॉन्टपिलियर’या संस्थांद्वारे देण्यात आले आहेत. हे चित्रपट तीन गटांमध्ये विभाजित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading