वैदिक परंपरेतील मंत्र हे वरवरचे नाहीत, त्यांचे सामर्थ्य मोठे – प्रवचनकार कल्याणी नामजोशी
पुणे : वैदिक परंपरेतील काही मंत्र हे फार प्रभावी आहेत त्यांच्या उच्चारात देखील ऊर्जा असते. जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा देवता प्रकट होत असते. परंतु आपल्या सुक्ष्म नजरेला ती दिसत नाही. देवता आपले काम करते, ती मंत्राला अधीन असते. त्यामुळे या मंत्रांमध्ये निष्फल आणि वरवरचे असे काहीच नसते. मंत्रांमध्ये खूप सामर्थ्य आहे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार कल्याणी नामजोशी यांनी व्यक्त केले.
ग्रंथ पारायण दिंडी तर्फे द्वादश श्रीविष्णु याग सांगता कार्यक्रमांतर्गत १२ व्या विष्णु पंचायतन याग सोहळ्याचे आयोजन मुकुंदनगरमधील श्री दौलत राम मंदिर प्रांगणात करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक विरेंद्र कुंटे, भाग्यलता पाटसकर, वासंती दांडेकर, राहुल भाटे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर सामुहिक विष्णुसहस्त्रनाम पठण झाले.
कल्याणी नामजोशी म्हणाल्या, उत्सव साजरा करण्याची संकल्पना समाजात बदलत चालली आहे. उत्सवाचे पावित्र्य बाजूला राहते. पुजेबरोबरच याग देखील समाजात प्रतिष्ठेने उभे रहावेत. याग करण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी. यागाचे महत्त्व कळले तर पुजेचेही महत्त्व कळेल. विष्णू सहस्त्रनाम मंत्रांमध्ये विष्णू देवतेचे वेगळ्या प्रकारचे अधिष्ठान आहे या मंत्रांमध्ये कोणताही भेद नाही त्यामुळे अतिशय प्रभावी असा हा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्या अंतर्गत दि. १९ एप्रिल रोजी सकाळी विष्णुयाग होणार असून सायंकाळी कीर्तनकार संज्योत केतकर यांचे कीर्तन होईल. दि. २० एप्रिल रोजी सकाळी महारुद्र स्वाहाकर, दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी सौरसूक्त मन्यु – सूक्त स्वाहाकर आहे. तर, दोन्ही दिवस सायंकाळी प्रणव गोखले यांचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म याविषयावरील प्रवचन होणार आहे. शुक्रवार, दिनांक २२ एप्रिल रोजी सोहळ्याची सांगता होणार असून सकाळी नवचंडी याग आणि सायंकाळी पं. आनंद भाटे यांचा अभंगवाणी कार्यक्रम होईल.
विरेंद्र कुंटे म्हणाले, पुण्यासह सातारा, सांगली, कोकण येथे यापूर्वी ११ विष्णु याग संपन्न झाले आहेत. संस्थेने बारा विष्णु याग करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्या १२ व्या यागाची सांगता पुण्यात होत आहे. ग्रंथ पारायण दिंडी तर्फे नंदकुमार देव, जयश्री देव, वसुधा दातार, द्वारकानाथ ऊंडे, राहुल भाटे यांनी आयोजनात भाग घेतला आहे.
